वृत्तसंस्था/ नागपूर
विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमच्या खेळपट्टीत कोणतेही राक्षस नव्हते. फिरकीला अनुकूल उपखंडातील खेळपट्ट्यांवर यशस्वी होण्यासाठी तेथे निर्धाराने टिकून राहणे आणि नियोजन महत्त्वाचे आहे, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दणदणीत विजयानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केली. सलामीची कसोटी सुरू होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियन मीडियाने खेळपट्टीवरून वादविवाद सुरू करताना भारताने डावखुऱ्या फलंदाजांना लक्ष्य करण्यासाठी पद्धतशीर फिरकीस पोषक खेळपट्टी तयार केली असल्याचा दावा केला होता.
पहिल्या डावात भारताने काढलेल्या 400 धावांमध्ये 120 धावा काढणारा रोहित म्हणाला की, अशा खेळपट्टीवर धावा करण्यासाठी फलंदाजाने काही वेगळ्या मार्गांचा अवलंब करणे आवश्यक असते. गेली काही वर्षे आम्ही भारतात ज्या प्रकारच्या खेळपट्ट्यांवर खेळत आहोत त्या पाहता तेथे निर्धाराने टिकून राहण्याची आणि धावा काढण्यासाठी काही योजना असण्याची गरज असते.
मी मुंबईत चेंडू खूप वळणाऱ्या खेळपट्ट्यांवर खेळून मोठा झालो आहे. अशा वेळी काही तरी वेगळे करून गोलंदाजांवर दबाव आणण्याची गरज असते, उदाहरणार्थ पायांचा वापर करणे, स्वीप किंवा रिव्हर्स-स्वीप करणे, असे त्याने सांगितले. रोहितला विजयाबरोबर त्याच्या शतकामुळेही भरपूर आनंद झाला आहे. बऱ्याच गोष्टींचा विचार करता ते विशेष शतक होते. मालिकेच्या सुरुवातीसच आम्ही जागतिक कसोटी स्पर्धेच्या गुण्तक्त्यावर कुठे उभे आहोत हे कळणे खूप महत्वाचे आहे. आमच्यासाठी चांगली सुऊवात करणे महत्वाचे आहे, असे तो म्हणाला.









