कराडला परीक्षार्थी, नोकरदारांची मोठी गैरसोय; 15 किमी रांगा; अखेर भराव पूल खुला
प्रतिनिधी/ कराड
पुणे-बेंगलूरू आशियाई महामार्गावर मलकापूर-कराडचा भराव पूल पाडण्याचे काम सुरू होणार असल्याने तो शुक्रवारी मध्यरात्रीपासून बंद करण्यात आला. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासून राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्प होऊन हजारो वाहने तब्बल सात तास अडकून पडली. खोडशीपासून वाठारपर्यंत सुमारे 15 किलोमीटर वाहतुकीचा खोळंबा झाल्याने दहावी, बारावीच्या परीक्षार्थींना डोळ्यात पाणी आणून गाडी रस्त्यात सोडून धावत परीक्षा केंद्र गाठावे लागले. काहींना पेपरला जाण्यासाठी विलंब झाला. शालेय विद्यार्थी, नोकरदारवर्गाचीही फरफट झाली. वाहतूक कोंडी मोकळी करताना पोलीस मात्र घामाघूम झाले. दरम्यान, सहा तासानंतर भराव पुलावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.
कागल ते शेंद्रे या दरम्यान सध्या सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. सध्या हे काम कराड, मलकापूर शहरात सुरू असून अत्यंत वर्दळीच्या ठिकाणचा एक उड्डाणपूल पाडण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तर कराडच्या अक्षता मंगल कार्यालय ते मलकापूर फाटा या दरम्यानचा भराव पूल पाडण्याचे नियोजन शुक्रवारपासून सुरू केले आहे.
कागदावरचे नियोजन फसले
मलकापूर येथील भराव पूल हा पूर्णतः वर्दळीने घेरलेला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला सेवारस्त्याला लागूनच अगदी फुटपाथशेजारीच शेकडो दुकानगाळे, हॉटेल, अपार्टमेंट, घरे आहेत. या परिस्थितीत भराव पूल पाडण्यासाठी याच सेवारस्त्यावरून हायवेची वाहतूक वळवण्याचे कागदोपत्री नियोजन जिल्हा प्रशासन व पुलाचे काम घेतलेल्या कंपनीकडून झाले. त्याची अंमलबजावणी शुक्रवारी पहाटेपासून करण्यात आली. भराव पुलावरील पुणे ते कोल्हापूर हायवेची वाहतूक सेवारस्त्यावर वळवली. अवजड वाहने, मोठे कंटेनर, ट्रव्हल्स, एसटी यासह चार चाकी वाहने सेवारस्त्यावर उतरल्याने वाहतुकीचा प्रचंड खोळंबा झाला. सकाळी सातपासून वाहतूक ठप्प होण्यास सुरूवात झाली. दुपारी 12 वाजेपर्यंत वाहतूक कोंडी कायम होती. वाहतूक कोंडीत लांब पल्ल्याच्या वाहनांसह स्थानिक वाहनधारकही अडकून हैराण झाले. तब्बल सात तास वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलीस आणि डी. पी. जैन कंपनीचे कर्मचारी प्रयत्न करत होते.
वाहतूक कोंडी मोकळी करताना प्रशासन हतबल
वाहतूक कोंडीत स्थानिक नोकरदार, शालेय विद्यार्थी, बारावीचे विद्यार्थी यांची तारांबळ उडाली. रिक्षा, एसटीने प्रवास करणारे तालुक्यातील प्रवासी वाहतूक कोंडीत अडकल्याने अखेर ते वाहने सोडून रस्त्याने अक्षरशः धावत सुटले. भराव पुलाच्या दोन्ही बाजूचे सेवा रस्ते ब्लॉक झाल्याने पोलिसांचीही दमछाक झाली. शिट्टय़ा पुंकून आणि वाहनधारकांना हातवारे करून पुढे घालवताना पोलीस, जैन कंपनीचे कर्मचारी घामाघूम होत हतबल झालेले दिसत होते.
राष्ट्रीय महामार्गाला जोडणारे रस्तेही कोंडीत
चार किलोमीटरचा भराव पूल पाडण्यासाठी हायवेची वाहतूक सेवारस्त्यावरून वळवण्याचा कागदी आराखडा प्रत्यक्षात फेल गेल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. कारण राष्ट्रीय महामार्गावर 15 किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झालीच शिवाय उंडाळे रोड, ढेबेवाडी रोड, पाटण रोड, कराड रोडवरही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे हायवेबरोबरच स्थानिक वाहनांनाही ऐन उन्हाच्या कडाक्यात वाहतूक कोंडीत अडकावे लागले. स्थानिक वाहनधारकांचे हाल झाल्याने कराड दक्षिण, पाटण भागातून आलेल्या दैनंदिन वाहनधारकांच्या संतप्त प्रतिक्रिया होत्या.








