सांगली-शेगाव बस प्रवास सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
सांगली : सांगली डेपोच्या शेगावमार्गी चालणाऱ्या बससेवेतील बेफिकीरी व गैरव्यवस्था दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. प्रवाशांकडून मिळालेल्या माहितीनुसार सांगली डेपोतून शेगावकडे फक्त दोनच गाड्या धावतात. मात्र या दोन्ही गाड्यांच्या नियोजनात गंभीर त्रुटी दिसून येतात. सांगली ते शेगाव हे अंतर तब्बल ७५० किमी असून इतक्या लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लाग्-ात आहे. रिझर्वेशन करताना गाडी स्लीपर कोच असल्याचे सांगितले जाते.
मात्र प्रत्यक्षात साधी गाडी धावते. यामुळे प्रवाशांची दिशाभूल होते, आणि नंतर परतावा मिळणे ही वेगळी बाब ठरते. अशा गाडीने शक्यतो फॅमिलीसह लोक प्रवास करतात. पण गाडीची अवस्था व क्षमतेनुसार ती शेगावपर्यंत सुरक्षित पोहोचेल का याबद्दलच प्रवाशांमध्ये शंका निर्माण झाली आहे. साडेचारची सांगलीहून सुटणारी गाडी अनेकदा पाच वाजेपर्यंत लावली जात नाही. मात्र शेगावहून निघताना गाडी वेळेवर म्हणजे साडेतीन वाजता निघते.
धक्कादायक म्हणजे बीडपर्यंत एकच ड्रायव्हर गाडी याहून चालवतो आणि तेथे ड्रायव्हर बदलला जातो. नुकत्याच घडलेल्या घटनेत बीड येथील ड्युटीवरील ड्रायव्हरचा मोबाईल बंद असल्यामुळे गाडी अर्धा तास बीड स्टँडवर थांबून होती. शेवटी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एका कंडक्टरला गाडी पुढे घेऊन जाण्याच्या सूचना दिल्या.
या सर्व घटनांमधून सांगली डेपोमधील नियोजनातील उणीव आणि गोंधळ स्पष्टपणे दिसून येतो. गाडीची अवस्था पाहता, अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ केला जात आहे, हे दुर्लक्षित करता कामा नये.








