इंडिगो विमानात गोंधळ, दर्शनी भाग तुटला
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळामुळे दिल्लीहून श्रीनगरला जाणारे इंडिगो एअरलाईन्सचे विमान एअर टर्ब्युलन्समध्ये अडकले. खराब हवामान आणि जोरदार वादळात उड्डाण करणाऱ्या या विमानाच्या दर्शनी भागाचे नुकसान झाल्याने विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. यामुळे विमानात बसलेल्या प्रवाशांमध्ये घबराट पसरली. सदर विमानात 227 प्रवासी होते. अनेक समस्या असूनही, केबिन क्रूने सर्व प्रोटोकॉलचे पालन करत श्रीनगरमध्ये विमान सुरक्षितपणे उतरवले. दरम्यान, या घटनेवेळी पाकिस्तानने आपल्या हवाई क्षेत्राचा आणि हवाई पट्टीचा वापर करण्यास नकार दिल्याची माहितीही पुढे आली आहे.
पाकिस्तानच्या या कृतीमुळे 227 प्रवाशांचा जीव धोक्यात जाण्याची संभाव्य भीती असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विमानाच्या तीव्र हादऱ्यांमुळे प्रवाशांमध्ये भीती स्पष्टपणे दिसून येत होती. या इंडिगो एअरलाईन्सच्या विमानात तृणमूल काँग्रेसचे एक शिष्टमंडळही प्रवास करत होते. या घटनेवेळी प्रवासी मोठ्याने ओरडत होते, असे शिष्टमंडळ सदस्य आणि पक्षाच्या खासदार सागरिका घोष यांनी सांगितले. तर काही लोक प्रार्थना करत होते. मला असे वाटत होते की मी मरणार आहे. आयुष्य संपत येत आहे. आपल्या सर्वांचे प्राण वाचवणाऱ्या पायलटला सलाम, अशा भावना घोष यांनी व्यक्त केल्या.









