वृत्तसंस्था/ टेगुसिगाल्पा
रोआटन बेटावरून उड्डाण केल्याच्या काही मिनिटांनीच होंडुरासच्या किनाऱ्यावर विमान दुर्घटनाग्रस्त झाले आहे. या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला तर 5 जणांचा जीव वाचला आहे. या दुर्घटनेनंतर एक जण बेपत्ता झाला आहे. मृतांमध्ये गारिफुना संगीतकार ऑरेलियो मार्टिनेज सुआजो यांचा समावेश असल्याचे अधिकाऱ्यांकडुन सांगण्यात आले.
होंडुरास एअरलाइन लान्हसाकडून संचालित छोट्या जेटस्ट्रीम विमानाचे अवशेष बेटाच्या किनाऱ्यापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर मिळाले आहेत. विमानातून एक अमेरिकन नागरिक, एक प्रेंच नागरिक आणि दोन अल्पवयीन प्रवास करत होते. हे विमान होंडुरासच्या ला सेइबा विमानतळावर उतरणार होते.
या विमान दुर्घटनेत ऑरेलियो मार्टिनेज सुआजो यांचा मृत्यू झाला आहे. ऑरेलियो यांना गारीफुना संगीतातील स्वत:च्या योगदानासाठी ओळखले जाते. याचबरोबर ते राजकारणात अत्यंत सक्रीय राहिले होते. मार्टिनेज हे होंडुरासच्या गारिफुना संगीतासाठी एक प्रसिद्ध मॉडेल होते असे त्यांच्या पुतण्याने म्हटले आहे. तर सुला खोऱ्याच्या आफ्रिकन वंशीयांच्या संघटनेचे अध्यक्ष हम्बर्टो कॅस्टिलो यांनी मार्टिनेज यांना ‘गारिफुना संस्कृतीचा राजदूत’ असे संबोधिले.









