खराब हवामानामुळे दुर्घटना घडल्याचा अंदाज
वृत्तसंस्था/ ब्राझिलिया
ब्राझीलमध्ये एका विमान दुर्घटनेत वैमानिक आणि सहवैमानिकासोबत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ब्राझील तसेच अमेरिकेच्या नागरिकांचा समावेश आहे. सर्व प्रवासी हे बार्सिलोस येथे मासेमारी करण्यासाठी जात होते.
ही विमान दुर्घटना अमेजोनास प्रांताची राजधानी मनॉसपासून सुमारे 400 किलोमीटर अंतरावरील बार्सिलोस प्रांतात घडली आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार ही दुर्घटना शनिवारी रात्री 11.30 वाजता घडली आहे. ब्राझीलच्या सिव्हिल डिफेन्सने सर्व जण मृत्युमुखी पडल्याची पुष्टी दिली आहे.
दुर्घटनेवेळी मुसळधार पाऊस पडत होता. खराब हवामानामुळे वैमानिकाला विमान लँड करविताना धावपट्टीचा अंदाज आला नसावा असे मानले जात आहे. नॅशनल सिव्हिल एव्हिएशन एजेन्सीनुसार ईएमबी-110 नावाचे हे विमान 18 प्रवासीक्षमता बाळगून होते आणि ते मनॉस टॅक्सी ऐरियो या कंपनीचे होते. हे विमान मनॉसपासून बार्सिलोसच्या दिशेने जात होते. कंपनीने देखील या दुर्घटनेची पुष्टी दिली आहे.
घटनास्थळावरून सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. नजीकच्या शहरात कोल्ड स्टोरेज सुविधा नसल्याने सर्व मृतदेह दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आले. ब्राझीलच्या वायुदलाचे विमान बार्सिलोस येथे पोहोचले असून त्याद्वारे हे मृतदेह संबंधितांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचविले जाणार आहेत.