धुक्यामुळे दुर्घटना घडल्याचा अंदाज
वृत्तसंस्था/ कॅलिफोर्निया
अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये शनिवारी विमान कोसळले आहे. या विमानातून प्रवास करणाऱ्या सर्व 6 जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. या भागात मागील एक आठवड्यात झालेली ही दुसरी मोठी विमान दुर्घटना आहे. अमेरिकेच्या प्रमाणवेळेनुसार पहाटे 4.15 वाजता फ्रेंच व्हॅली विमानतळानजीक मुरिएटा भागात ही दुर्घटना घडली आहे. दुर्घटना कशामुळे घडली याचा तपास केला जात आहे. धुक्यामुळे वैमानिकाला धावपट्टी न दिसल्याने ही दुर्घटना घडली असावी असा संशय अधिकाऱ्यांना आहे.
हे विमान सेसना सी 550 बिझनेस जेट प्रकारातील होते. या विमानाने लास व्हेगासच्या हॅरी रीड आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उ•ाण केले होते. दुर्घटनाग्रस्त झाल्यावर विमानात आग लागली होती. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. यापूर्वी मंगळवारी सेसना जेट फ्रेंच व्हॅली विमानतळानजीक कोसळले होते. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तर 3 मुले जखमी झाली होती.









