ऑनलाईन टीम/तरुण भारत
पेरुमधील (Peru) लिमा विमानतळावर शुक्रवारी एक मोठी दुर्घटना टळली आहे. एक विमान धावपट्टीवर टेक ऑफ करताना एक भीषण अपघात झाला. विमान आणि अग्निशमन दलाच्या ट्रकचा हा अपघात झाला. यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. धावपट्टीवर अग्निशमन दलाचा ट्रक विमानाला जोरदार धडकला. ज्यामुळे मोठ्याप्रमाणात आगीची घटनाही घडली. अपघातात मृत्यू झालेले दोन्ही अग्निशमन दलाचे जवान होते. सुदैवाने १०८ जण या अपघातातून बचावले. या घटनेचा एक व्हिडीओ आता समोर येत आहेत. (Plane Collides with Truck on Runway in Peru While Taking Off & Bursts in Flames, 2 Killed)
या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला विमानाला मागील बाजूने आग लागल्याचे दिसत आहे. विमान थांबलं तेव्हा आजूबाजूला धुराचं साम्राज्य दिसत होतं. विमान फायर इंजिनला धडकले त्यावेळी या विमानात क्रू मेंबर्ससह एकूण १०८ प्रवासी होते. हे विमान पेरूच्या LATAM एअरलाइन्सचे होते.
LATAM एअरलाईन्सचे एक विमान जॉर्ज चावेज आंतरराष्ट्रीय विमानतळावर धावपट्टीवर धावत होते. एवढ्यात एक अग्निशमन दलाचा ट्रक धावपट्टीवर आला. ज्यामुळे विमान त्या ट्रकला जोरदार धडकले. हा अपघात इतका भीषण होता की, विमानाचा एक पंख जमिनीवर फरफटत गेला. त्यामुळे विमानाच्या विंगमध्ये मोठी आग लागली, मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. विमानातील इतर प्रवासी आता सुरक्षित आहेत. या घटनेवेळी विमानात 102 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स होते. सर्वजण थोडक्यात बचावले.
या घटनेनंतर विमानतळ काही काळासाठी बंद ठेवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. अपघातानंतर विमानतळावरील सर्व कामकाज काही काळासाठी स्थगित करण्यात आले होते. या घटनेची आता सखोल चौकशी केली जाणार आहे.