आमदार प्रकाश आबिटकर यांचे निर्देश : पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
प्रतिनिधी/कोल्हापूर
राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली खोयातील धामणी मध्यम प्रकल्प व आजरा तालुक्याच्या सर्फनाला मध्यम प्रकल्पाची कामे सुरू करण्यासाठी योग्य पध्दतीने नियोजन करा, असे निर्देश आमदार प्रकाश आबिटकर यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
कोल्हापूरातील सिंचन भवन येथे ते राधानगरी, भुदरगड, आजरा विधानसभा मतदार संघातील धामणी, सर्फनाला, नागणवाडी, चिकोत्रा, लोंढानाला आदी प्रकल्पांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता महेश सुर्वे, माजी पंचायत समिती सदस्य अरुणराव जाधव, सागर धुंदरे, कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील, कार्यकारी अभियंता स्मिता माने, कार्यकारी अभियंता विनया बदामी आदी उपस्थित होते.
आमदार आबिटकर यांनी राधानगरी विधानसभा मतदार संघामध्ये अनेक पाटबंधारे प्रकल्पांची कामे सुरू आहेत. तसेच काही प्रकल्पांची कामे लवकरच सुरू होणार आहेत. त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांना नागरी सुविधा देखील पुरविणे गरजेचे आहे. त्यासाठी पुनर्वसन विभागासोबत समन्वय ठेवून योग्य ती कार्यवाही करावी असे सांगितले. प्रकल्प पुर्ण होतील पण साठणाया पाण्याचे योग्य नियोजन होणे गरजेचे आहे. यासाठी सर्फनाला, धामणी, चिकोत्रा व नागणवाडी प्रकल्पावर जे जुने केटीवेअर आहेत ते दुरूस्त करावे, तसेच जे नवीन मंजूर केटीवेअरचे बांधकाम तात्काळ सुरू करावेत, अशा सुचनाही यावेळी त्यांनी केल्या. त्याचबरोबर लोंढा नाल्यावरील प्रस्तावित 17 केटीवेअरची कामे तात्काळ पुर्ण करावीत, पाणी आरक्षीत करण्यासाठी पाटबंधारे विभागामार्फत जे कॅम्प आयोजित केले आहे तेथे योग्य कागदपत्रांची पुर्तता करून पाणी परवाने देण्यात यावेत, अशा सुचनाही त्यांनी दिल्या.
कुर ते मिणचे पोट कालव्याचे काम सुरु करा
कुर ते मिणचे या पोटकालव्याचे अस्तरीकरण करण्यासाठी योग्य तो प्रस्ताव करून उपलबध निधीतून काम सुरू करावे, अशा सुचना आमदार आबिटकर यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या. सर्फनाला प्रकल्पातील पाणी दाभील गावासाठी देण्यासाठी नवीन कॅनॉल निर्मितीसाठी सर्व्हे करावा, येत्या काळात शेतकयांना शेतीसाठी वेळेत पाणी उपलब्ध होण्यासाठी पाणी सोडण्याचे योग्य नियोजन करावे, अशाही सुचना त्यांनी दिल्या.