रागाच्या भरात घराबाहेर मुलीने लावले पोस्टर
सध्याची मुले अत्यंत हुशार असल्याचे बोलले जाते. परंतु ही मुले अनेकदा निरागसपणे असे काही तरी करून जातात ज्याचा मोठ्या लोकांनी विचारही केलेला नसतो. आता आईवडिलांकडे मुलांनी हट्ट करणे आणि अनेकदा त्यांच हे हट्ट पूर्ण न होणे नवी बाब नाही. परंतु आपला हट्ट पूर्ण न झाल्याने आईवडिलांना धडा शिकविण्याचा मुलांनी विचार केला तर काय घडेल? सोशल मीडियावर एका व्यक्तीने अशीच घटना शेअर केली आहे.
या व्यक्तीने स्वत:च्या 8 वर्षीय मुलीचे म्हणणे ऐकले नाही, मग तिने वडिलांना धडा शिकविण्याचा चंग बांधला. या मुलीने स्वत:च्या घराच्या दरवाजावर पेन्सिलने लिहिलेली एक नोटीस झळकविली. या नोटीसमधील मजकूर पाहून या मुलीच्या वडिलांना हसावे की रडावे हेच कळत नाही.

या नोटीसमध्ये तिने ‘फादर फॉर सेल अॅट रुपीज 2 लाख, फॉर मोर इन्फो रिंग बेल (वडिल विकायचे आहेत, केवळ 2 लाख रुपयांमध्ये, अधिक माहितीसाठी बेल वाजवा)’ असे लिहिले होते. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये दरवाजावर लटकलेली नोटीस स्पष्टपणे दिसून येत आहे. तर तिच्या वडिलांना आपली किंमत केवळ 2 लाख रुपयेच का असा प्रश्न पडला.
या व्यक्तीच्या पोस्टवर लोकांनी कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका युजरने तुमची मुलगी किती प्रेमळ आहे असे नमूद पेले आहे. तर दुसऱ्या युजरने तुमची मुलगी बुद्धिमान असून वडिल आपला हट्ट पूर्ण करत नसल्याने त्यांनाच विकण्याची तिची कल्पना चकित करणारी असल्याचे म्हटले आहे. भावा, ही मुलगी व्यवसाय उत्तम सांभाळेल, जे कामाचे नाही ते सर्व काही विकून टाकेल असे अन्य एका युजरने स्वत:च्या कॉमेंटमध्ये नमूद केले आहे.
यापूर्वी एका मुलीच्या वडिलांच्या मजेशीर मॅसेजचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला होता. यात मुलीने व्हॉट्सअॅपवर वडिलांना स्वत:च्या अणि मित्राच्या ब्लड रिपोर्टबद्दल विचारले होते. यावर तिच्या वडिलांनी ‘ब्लड रिपोर्टमध्ये देखील तो ए प्लस आणि तू बी मायनस’ असे उत्तर दिले होते. या स्क्रीनशॉटसोबत मुलीने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये ‘वडिलांपेक्षा अधिक चांगला अपमान अन्य कुणीच करू शकत नाही’ असे नमूद केले होते.









