सुदानसंबंधी बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा केंद्र सरकारच्या अधिकाऱयांना आदेश
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गृहयुद्धग्रस्त सुदान देशात अनेक भारतीय अडकले असून त्यांच्या सुटकेसाठी योजना तयार करा, असा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकाऱयांना दिला आहे. शुक्रवारी या संदर्भात दिल्लीत महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला केंद्रीय गृहविभाग, परराष्ट्र मंत्रालय आणि इतर संबंधित विभागांचे उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत हा आदेश देण्यात आला आहे.
सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांची स्थिती जाणून घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान मोदी यांनी अधिकाऱयांकडून यासंबंधी सविस्तर माहिती घेतली. तेथील भारतीय नागरिक संकटात आहेत. सरकारी सैनिक आणि माफियांचे सैनिक यांच्यातील युद्धात त्यांची अवस्था बिकट झाली आहे. त्यांना त्यांच्या घरातून बाहेर न पडण्याचा आदेश देण्यात आला आहे. कित्येक ठिकाणी पिण्याचे पाणीही मिळणे अवघड झाले आहे. अशा स्थितीत भारतीय तेथे रहात आहेत. त्यांची सुटका करणे आवश्यक आहे, अशी माहिती देण्यात आली.
तातडीची योजना आखणार
भारतीयांच्या सुटकेसाठी काय करता येईल, यावर बैठकीत विचार झाला. आकस्मिक योजना आखून त्यांची सुटका करता येईल काय यावर चर्चा झाल्याचे समजते, अशा योजनेसाठी काय करावे लागेल आणि ही योजना कितपत व्यवहार्य असेल याचा आढावा घेण्यात आला. आतापर्यंत सुदानमध्ये संघर्षात एका भारतीयांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या देशात साधारणतः 3 हजार भारतीय अडकलेले आहेत. त्यांना सोडविण्यासाठी रॅपिड सपोर्ट फोर्सची (आरएसएफ) साहाय्यता घेता येईल काय, यावरही खल करण्यात आल्याचे समजते.
दुतावास संपर्कात सुदानमधील भारतीय दुतावास तेथील भारतीय नागरिकांच्या प्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष मार्गाने संपर्कात आहे. बहुतेक भारतीय सुरक्षित आहेत. मात्र, त्यांना आहार आणि पिण्याचे पाणी यांच्या अडचणी आहेत. भारत सरकार अन्य देशांच्या साहाय्याने तेथील भारतीयांच्या सुरक्षेवर लक्ष ठेवून आहे, अशी माहिती देण्यात आली.









