पुणे / प्रतिनिधी :
हॉटेलमधील ग्राहक वाढविण्यासाठी पुण्यातील एका हॉटेल चालकाने सुरू केलेली ‘मोफत सूप’ योजना त्याच्याच अंगलट आली आहे. ग्राहकांची संख्या रोडावल्याने दुसऱ्या हॉटेल चालकाने धारदार हत्याराने वार करत व मारहाण करीत संबंधित हॉटेल मालकास जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात सिद्धार्थ भालेराव, दिग्विजय गजरे (रा. खडकी, पुणे) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत आरोपीविरोधात मुलायम रामकृपाल पाल (वय 27, रा. खडकी, पुणे) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. सदरची घटना सहा फेब्रुवारी रोजी मेवाड पावभाजी सेंटरसमोर चौपाटी खडकी येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुलायम पाल यांच्या संबंधित ठिकाणी ‘ओ शेठ’ नावाचे हॉटेल आहे. तर त्यांच्या हॉटेलजवळच आरोपींचे ‘साहेब’ नावाचे हॉटेल आहे. तक्रारदार यांनी त्यांच्या हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढावी, याकरिता जेवणाअगोदर ‘मोफत सूप’ देण्याची योजना नुकतीच सुरू केली होती. त्यामुळे ग्राहक मोठय़ा प्रमाणात हॉटेलला येऊ लागल्याने दुसऱया हॉटेलमधील ग्राहकांची संख्या कमी होऊ लागली. या गोष्टीचा राग मनात धरून आरोपी सिद्धार्थ भालेराव आणि दिग्विजय गजरे यांनी तक्रारदार मुलायम पाल यांच्या डोक्यात लोखंडी धारदार हत्याराने प्रहार करून जखमी केले. तसेच ‘येथे धंदा का करता’ म्हणून शिवीगाळ केली.
अधिक वाचा : …तोपर्यंत प्रचारात सहभागी होऊ नका; मनसेच्या कार्यकर्त्यांना सूचना









