महापौरांनी घेतली एलअॅण्डटी कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक
बेळगाव : यावर्षी पावसाने पाठ फिरविल्यामुळे पाणी समस्या गंभीर बनण्याची शक्यता आहे. शहराला 24 तास पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणी पुरविण्याबाबत महापौर शोभा सोमणाचे यांनी एलअॅण्डटी कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना पाणी समस्या दूर करण्याबाबत सूचना केल्या आहेत. यावेळी उपमहापौर रेश्मा पाटील देखील उपस्थित होत्या. पाण्याची समस्या गंभीर बनण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच योग्य ते नियोजन करण्यास सुरुवात करा. पाणीपुरवठा पाईपना बऱ्याच ठिकाणी गळती लागून हजारो लिटर पाणी वाया जात असते. त्यामुळे आणखी पाणी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. तेव्हा पाण्याच्या गळती काढण्यासाठी प्रथम प्रयत्न करा. ज्या प्रभागामध्ये 24 तास पाणीपुरवठा अजून करण्यात आला नाही त्या ठिकाणी पाईप घालून 24 तास पाणीपुरवठा करावा, असे त्यांनी सांगितले. पावसाने दडी मारल्यामुळे भूजल पातळी खालावली आहे. सध्या हिडकल जलाशयामध्ये पाणी असले तरी राकसकोप जलाशयातील पाणी लवकर संपण्याची शक्यता आहे. तेव्हा त्या दृष्टिने नियोजन करणे महत्त्वाचे आहे. ज्या उपाययोजना करायच्या आहेत आताच करा, असे महापौर शोभा सोमणाचे यांनी सांगितले. यावेळी सत्ताधारी गट नेते राजशेखर डोणी, नगरसेवक रवी धोत्रे, शंकर पाटील, वाणी जोशी, वीणा विजापुरे यांच्यासह इतर नगरसेवक व एलअॅण्डटी कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.









