वृत्तसंस्था/ मेलबर्न
ऑस्ट्रेलियाचा 19 वर्षीय सॅम कोन्स्तास काही वर्षांपूर्वी नाताळाच्या पूर्वसंध्येला त्याच्या भावासोबत मागीलदारात क्रिकेट खेळायचा. पण यावेळी तो भारताविऊद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीत जगातील सर्वांत भेदक वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा कसा सामना करायचा त्याची योजना आखत आहे. माझ्याकडे बुमराहसाठी एक योजना आहे, पण ती काय आहे ते मी सांगणार नाही, असे कोन्स्तासने त्याच्या बहुप्रतिक्षित कसोटी पदार्पणाच्या तीन दिवस आधी सोमवारी पत्रकारांना सांगितले.
सलामीवीर नॅथन मॅकस्विनीनेही बुमराहच्या बाबतीत असेच म्हटले होते. परंतु तीन कसोटी सामन्यांमध्ये त्याला पाचपैकी चार वेळा बुमराहकडून बाद करण्यात आले. यामुळे त्याला अखेर संघातून वगळण्यात आले. कोन्स्तासने धावा काढलेल्या दोन सराव सामन्यांमध्ये बुमराह हा भारतीय माऱ्याचा भाग नव्हता. त्यामुळे बुमराहखेरीज कोण लक्षणीय दिसला असे विचारले असता तो म्हणाला की, सर्व गोलंदाज खूप चांगले व जागतिक दर्जाचे आहेत. या आव्हानाचा अनुभव घेण्यास मी उत्सुक आहे.









