चित्ररथ महामंडळाची पोलीस प्रशासनाकडे मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावत यंदा 4 मे रोजी शिवजयंतीनिमित्त शिवचित्ररथ मिरवणूक काढली जाणार आहे. ही मिरवणूक शांततेत व शिस्तबद्ध व्हावी, यासाठी येणाऱया समस्या आतापासूनच दूर कराव्यात, अशा मागणीचे निवेदन शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे पोलीस आयुक्तांना मंगळवारी देण्यात आले. पोलीस उपायुक्त रविंद्र गडादी यांनी महामंडळाच्या पदाधिकाऱयांसोबत चित्ररथ मिरवणूक मार्गाची पाहणी करण्याचे आश्वासन दिले.
चित्ररथ मिरवणुकीत दरवषी येणाऱया रहदारीच्या अडचणीविषयी तसेच मारुती गल्ली कॉर्नर, नरगुंदकर भावे चौक येथे होणारी गर्दी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रयत्न करावेत. दरवषी मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी मंडळांमध्ये संघर्ष होतो. गणपत गल्लीमार्गे काही चित्ररथ तर काही चित्ररथ कलमठ रोडमार्गे नरगुंदकर भावे चौकात येतात. यावेळी मिरवणूक मार्गात घुसण्यासाठी संघर्ष होतो. हे टाळण्यासाठी आतापासूनच नियोजन करावे. चित्ररथ वेळेत बाहेर काढण्यासाठी पोलीस प्रशासनाने आतापासूनच मंडळासोबत नियोजन करावे. मिरवणूक मार्गावरील जाहिरातीचे फलक, विद्युतवाहिन्या, झाडांच्या फांद्या दूर कराव्यात, अशी मागणी केली. यावेळी महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव, सरचिटणीस जे. बी. शहापूरकर, उपाध्यक्ष मेघन लंगरकांडे, राहुल जाधव, लोकेश रजपूत, प्रसाद मोरे, आदित्य पाटील, प्रसाद पुजारी व इतर उपस्थित होते.









