वार्ताहर/सांबरा
सांबरा येथे मारुती गल्ली धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौकमधील महादेव व्यायाम मंडळातर्फे श्री दुर्गामातेची प्रतिष्ठापना करण्यात आली असून, सोमवार दि. 22 रोजी गावांमध्ये दुर्गामातेचा भव्य आगमन सोहळा पार पडला. मंडळाचे यंदाचे 24 वे वर्ष असून, दरवर्षी मंडळामार्फत अनेक विधायक कार्य राबविली जातात. दरवर्षी नवरात्रोत्सवात महाचंडीका होम व महाप्रसादाचे आयोजन केले जाते. बी एस येडियुरप्पा मार्ग जुने बेळगाव येथील मूर्तिकार मनोहर पाटील यांनी श्री दुर्गामातेची आकर्षक मूर्ती साकारली आहे. सायंकाळी चार वाजता श्री दुर्गामातेच्या आगमन सोहळ्ळ्याला सुरुवात झाली. माजी एपीएमसी सदस्य बाळू देसूरकर (बेनकनहळ्ळी) यांनी पूजन करून मिरवणुकीला चालना दिली. पारंपरिक टिपऱ्यांच्या गजरात मिरवणुकीला प्रारंभ झाला. त्यानंतर मिरवणूक लक्ष्मी गल्ली, भैरूदेव चौक, शुक्रवार पेठ, मंगळवार पेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मारुती गल्लीमार्गे धर्मवीर संभाजी चौक येथे आल्यानंतर दुर्गामातेची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी असंख्य भक्त उपस्थित होते.









