मागणीसाठी नगरपंचायतीवर मूकमोर्चा : ग्रामस्थ-पंचकमिटीतर्फे अधिकारी शिवकुमार यांना निवेदन
वार्ताहर /मच्छे
मच्छे गावातील काही युवकांकडून क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांची मूर्ती सार्वजनिक ठिकाणी दि. 5 जून 2023 रोजी मध्यरात्री बसवण्यात आली आहे. ज्या ठिकाणी ही मूर्ती बसवण्यात आली ती जागा योग्य नसून सदर मूर्ती दुसऱ्या योग्य ठिकाणी बसवावी, या मागणीसाठी नगरपंचायतीवर मूकमोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी समस्त ग्रामस्थ व पंचकमिटीतर्फे नगरपंचायत अधिकारी शिवकुमार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वडगाव पोलीस स्थानकाचे सीपीआय हजर होते. मूर्ती बसवण्याला आमचा विरोध नाही. परंतु चांगल्या ठिकाणी ही मूर्ती बसवावी, अशी आमची मागणी आहे. लोहार गल्ली येथून या मूकमोर्चाला सुरुवात होऊन मरगाई गल्ली, कचेरी गल्ली, विजय गल्ली, गणपत गल्लीमार्गे पंचायतीसमोर आल्यानंतर मूकमोर्चाची सांगता करण्यात आली. सध्याची मूर्ती बसविलेली जागा ही कृषी पत्तीन सोसायटीची खासगी जागा आहे. सदर जागेमध्ये स्वच्छतागृह असल्याने अशा गलिच्छ जागेमध्ये क्रांतिवीर संगोळ्ळी रायाण्णा यांची मूर्ती बसवून राष्ट्रपुरुषाचा अवमान केला आहे. अशा नागरिकांवर गुन्हा नोंदवावा तसेच सध्याला बसविण्यात आलेली संगोळ्ळी रायण्णा मूर्ती त्या ठिकाणाहून हलवून मच्छेतील श्री महालिंगराय मंदिरसमोर बसविण्यास मच्छे ग्रामस्थाकडून पाठिंबा आहे. सध्याची जागा ही जिजामाता चौक अशी नोंद आहे.
…तर मूर्ती प्रतिष्ठापनेचा इशारा
चौकाला जिजामाता चौक असे नाव दिलेले असताना जाणूनबुजून मूर्ती बसवण्याचे गौडबंगाल काय? काही जणांकडून जाणीवपूर्वक जाती व भाषेचा तेढ निर्माण करण्यात येत आहे. मच्छे गावातील सर्व भाषिक हे गुण्यागोविंदाने नांदत असतात. मात्र अशा अप्रिय घटनांमुळे सध्या मच्छे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा मूर्ती बसवण्याला ग्रामस्थांतून कोणताही विरोध नाही. मात्र निवडलेली जागा ही अयोग्य आहे. तसेच काही कन्नड संघटनेने पंचायतीला कोणतीही पूर्वकल्पना न देता 5 जून रोजी रात्री गुपचूप मूर्तीची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर नगर पंचायतीतर्फे आरोग्यदिनाचे फलक लावून ही जागा झाकून घेतली होती. या जागेवर पोलीस तैनात करून तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सध्या काही कन्नड संघटनांनी पुन्हा एकदा नगर पंचायतीला पाच ऑगस्टपूर्वी याबाबत तोडगा न काढल्यास 15 ऑगस्ट रोजी मूर्तीप्रतिष्ठापना करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे. त्यामुळे तणावात भर पडली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे लक्ष
यामुळे सर्व ग्रामस्थ, पचमंडळींनी आज नगरपंचायत अधिकाऱ्यांना व पोलीस अधिकाऱ्यांना भेटून याबाबत निवेदन दिले आहे. त्यामुळे आता वरिष्ठ अधिकारी या पुतळ्याबाबत कोणता निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.









