वाहतूक व्यवस्थेवर परिणाम, पादचाऱ्यांना नाहक त्रास
पणजी : पणजी शहरातील काही रस्ते हे जी-20 शिखर परिषदेसाठी चकाचक केले असले तरी अंतर्गत रस्ते, सांतिनेज परिसर या ठिकाणी मात्र विचित्र अनुभव आहे. कारण अजूनही शहरात विविध कारणासाठी रस्ते खणले आहेत, खड्डे खोदले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सांतीनेज येथील मुख्य रस्त्यावर मलनिस्सारण प्रकल्पासाठी खोदलेल्या खड्यात सांडपाणी साचल्याने आणि ते रस्त्यावर सोडले जात असल्याने परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर होत आहे. पादचाऱ्यांना चालणेही मुश्किल बनले आहे. शहरात अनेक प्रकल्पासाठी रस्ते खणलेले आहेत. सांतिनेज येथेही मलनिस्सारण प्रकल्पासाठी खोदण्यात आलेल्या खड्यातील पाणी पंपाद्वारे रस्त्यावर सोडले जात असल्याने प]िरसर चिखलमय झाला असून, रस्त्यावर घसरणही झाली आहे. सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याची दुर्गंधी येत आहे. सांतीनेज येथील हा मुख्य रस्ता म्हणजे वाहनचालकांसाठी अग्निदिव्य बनला आहे. तासनतास वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालकांचा वेळ खर्ची होत आहे. रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या पादचाऱ्यांनाही चालणे मुश्कील होत आहे. सांतीनेज मुख्य रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत करताना वाहतूक पोलिसांचीही दमछाक होत आहे. शहरात मलनिस्सारण प्रकल्पाची सुरू असलेली कामे ही सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे करण्यात येत आहेत.









