वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीदरम्यान वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणारे सॅम पित्रोदा यांच्याकडे पुन्हा तीच जबाबदारी देण्यात आली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी एक प्रेस स्टेटमेंट जारी करत काँग्रेस अध्यक्षांनी सॅम पित्रोदा यांची इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदी तत्काळ प्रभावाने नियुक्ती केल्याचे म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सॅम पित्रोदा यांनी एका मुलाखतीत केलेल्या वर्णद्वेषासंबंधीच्या वादग्रस्त वक्तव्याचे बरेच पडसाद उमटले होते. या वादानंतर सॅम पित्रोदा यांनी इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवल्यानंतर काँग्रेस अध्यक्षांनी त्यांना या पदावरून मुक्त केले होते. आता पुन्हा त्यांच्याकडे इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे.









