वृत्तसंस्था/ दुबई
अलीकडेच झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या न्यूयॉर्क फेरीसाठी वापरण्यात आलेल्या आणि भरपूर चर्चेत राहिलेल्या खेळपट्ट्यांबाबत आयसीसीच्या सामनाधिकाऱ्यांनी सौम्य भूमिका घेतलेली असून भारत विरुद्ध पाकिस्तान या लढतीसह आठ सामन्यांपैकी सहा सामन्यांतील खेळपट्टीला ‘समाधानकारक’ असे रेटिंग मिळालेले आहे.
आयर्लंडविरुद्धच्या भारताच्या सुरुवातीच्या सामन्यासह तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या नासारु काउंटी क्रिकेट स्टेडियमवरील केवळ दोन सामन्यांना खेळाच्या प्रशासकीय मंडळाकडून ‘असंतोषजनक’ असे रेटिंग मिळाले आहे. ही बाब अमेरिकेत क्रिकेटला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने उत्साहवर्धक आहे. श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यासाठी वापरण्यात आलेल्या खेळपट्टीलाही सामनाधिकाऱ्यांकडून प्रतिकूल शेरा लाभला आहे.
बऱ्याच विलंबानंतर आयसीसीने मंगळवारी आपल्या वेबसाइटवर खेळपट्ट्यांचे रेटिंग जाहीर केले. भारताने जिंकलेली ही स्पर्धा 1 ते 29 जूनदरम्यान खेळविण्यात आली होती. न्यूयॉर्कमधील सर्व आठ सामने हे कमी धावसंख्येचे राहिले होते आणि या आयसीसी स्पर्धेदरम्यान तज्ञ तसेच चाहत्यांनी खेळपट्टीवर कठोर टीका केली होती. 2028 च्या लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट पदार्पण करणार आहे. त्यापूर्वी आपले अस्तित्व दाखवून देण्याच्या दृष्टीने या खेळासाठी ही फारशी अनुकूल बाब नव्हती.
भारत न्यूयॉर्कमध्ये तीन सामने खेळला, तर फोर्ट लॉडरहिल येथील कॅनडाविऊद्धचा सामना वाहून गेला. न्यूयॉर्कमधील आठ सामन्यांत पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 107.6 इतकी कमी राहिली होती. रंजन मदुगले, डेव्हिड बून, जेफ क्रो आणि रिची रिचर्डसन हे न्यूयॉर्कमधील सामन्यांचे सामनाधिकारी होते.









