बेळगाव : अष्टमीनिमित्त सालाबादप्रमाणे देशपांडे गल्लीतील परांजपे कुटुंबीयांच्या घरी शनिवारी रात्री घागरी फुंकण्याचा कार्यक्रम झाला. यानिमित्त महालक्ष्मीच्या दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांनी गर्दी केली. यंदाचे हे 79 वे वर्ष आहे. सर्वप्रथम 1940 मध्ये दातार वाड्यामध्ये महालक्ष्मी पूजण्यात आली. कृष्णाबाई परांजपे यांनी महालक्ष्मी बसविण्याचा संकल्प केला. तेव्हा गोदुताई साठे, छत्रे आजी, डॉ. बाकरे, डॉ. घाणेकर कुटुंबीयांनी त्यांना सहकार्य केले. त्या काळी गोदुताईंनी पायलीभर तांदूळ दिले होते तर इंग्रज राजवटीत साखर वर्ज्य असल्याने दातारांनी गुळाची ढेप दिली होती. याशिवाय अन्य सर्वांनीच सहकार्य केले. विशेष म्हणजे महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी इंग्रज अधिकारीही आले होते.
देशपांडे गल्लीमध्ये परांजपे कुटुंबीयांच्या घरी 1946 पासून महालक्ष्मी उभारण्यास सुरुवात झाली. त्या काळी कमलाबाई परांजपे तांदळाची उकड करत असत. शुचिर्भूत होऊन तांदळाच्या उकडीपासून ही महालक्ष्मी उभी केली जाते. शनिवारी सकाळी वशावळ्या मुलींची पूजा झाली. त्यानंतर सहभोजन झाले. सायंकाळी 6 वा. उकड तयार करण्यात आली. 7.30 वा. गोविंद गणपुले यांनी महालक्ष्मी उभारण्यास सुरुवात केली. यंदा श्रीनिवास कुलकर्णी यांनी महालक्ष्मीचे रेखाटन केले. पूजा झाल्यानंतर महालक्ष्मीची ओटी भरण्यासाठी महिलांनी गर्दी केली. दर्शनासाठीही रांग लागली. रात्री 12 पर्यंत घागरी फुंकण्याचा कार्यक्रम झाला. पहाटे 5 पर्यंत जागर होऊन आरती व उत्तर पूजा करण्यात आली. या कार्यक्रमासाठी विजय परांजपे यांचा पुढाकार महत्त्वाचा ठरला.









