कोल्हापूर :
इचलकरंजी येथील पिस्तुल तस्कर मन्या उर्फ मनिष रामविलास नागोरी (वय 36, सध्या रा. ओंकारेश्वरनगर, यड्राव फाटा, ता. शिरोळ) हा शहरालगतच्या तावडे हॉटेल परिसरात मंगळवारी सकाळी बेशुध्द अवस्थेत मिळून आला. त्याला तत्काळ उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले असून, त्याच्यावर सीपीआरमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. त्याने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी, संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा राज्यात बेकायदेशिर पिस्तुल पुरविणारा म्हणून मन्या उर्फ मनिष नागोरी प्रसिध्द आहे. त्याने आतापर्यंत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील अनेक रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अवैधपणे काडतुसासह पिस्तुले पुरविले आहेत. या पिस्तुलाचा संबंधीत गुन्हेगारांनी खून, खूनाचा प्रयत्न, दरोडा, रोकड लुटण्याच्या गुह्यासाठी वापरल्याचा पोलिसांच्या तपासातून वेळोवेळी समोर आले आहे. तसेच त्याच्या विरोधी राज्यातील अनेक पोलीस ठाण्यात दरोडा, अग्निशस्त्र पुरविणे, खंडणी, अपहरण करणे, मारामारी यासारख्या गुह्याबरोबर एमडी सारखे अंमली पदार्थ पुरविण्याबाबत त्याच्या विरोधी गुन्हे नोंद आहे. त्याच्या गुन्हेगारी कारनाम्याची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन, त्याच्याविरोधी मोका कायद्यान्वये सुध्दा कारवाई केली होती. पण तो गेल्या काही महिन्यापूर्वी कारागृहाची हवा खाऊन वैयक्तिक जामिनावर कारागृहाच्या बाहेर आला आहे.
मनिष नागोरी मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास शहरालगतच्या तावडे हॉटेल परिसरातील एका हॉटेलसमोर बेशुध्द अवस्थेत पडलेला आढळून आला. त्याला तत्काळ उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले आहे. यावेळी त्याने विषारी औषध प्राशन करुन, आत्महत्येचा प्रयत्न केल्याची बाब उघडकीस आली. त्याच्यावर सीपीआरमधील अतिदक्षता विभागात उपचार सुऊ असून, तो रात्री उशिरापर्यंत बेशुध्द अवस्थेत होता. त्यामुळे त्याने विषारी औषध प्राशन का केले. याची नेमकी माहिती मिळू शकली नाही. या घटनेची नोंद गांधीनगर पोलिसात झाली आहे.








