फलटण :
फलटण तालुक्यातील दालवडी येथे एका कारमधून गांजा, पिस्तूल व जिवंत काडतूस मिळून आले आहेत. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी संबंधित कार मालकास चौकशीसाठी ताब्यात घेतले असून कारही जप्त करण्यात आली आहे. रविंद्र कोलवडकर असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयीताचे नाव आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की, दालवडी येथे एका कारमध्ये गांजा व पिस्तूल असल्याची माहिती ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी दालवडी येथील वन क्षेत्राच्या बाजूस राहत असलेल्या कोलवडकर यांच्या घरी पाहणी केली असता त्यांना त्याची कार घरापासून सुमारे दोनशे मिटर अंतरावर वनक्षेत्राच्या हद्दीत उभी असलेली दिसली. पोलिसांनी कोलवडकर यास घरातून बोलावून घेत त्याच्या कारची झडती घ्यायची आहे असे त्यांना सांगितले. तेव्हा त्यांनी स्वत:हुन गाडी उघडून दिली.
यावेळी पोलिसांनी कोलवडकर यांच्या कार क्रमांक एमएच 11 सीडब्लू 4844 मध्ये गांजा, पिस्तूल व दोन जिवंत काडतूसे मिळून आली. पोलिसांनी याबाबत कोलवडकर यांच्याकडे विचारणा केली असता त्याने सदर ऐवज आपल्या गाडीमध्ये कसा आला याबाबत आपणास काहीही माहिती नसल्याचे सांगितले. सदर घटनेवरून पोलिसांनी कार जप्त खेळू असून कोलवडकर याच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायदा कलम व आर्म अॅक्ट कलमान्वये एन.डी.पी.एस अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर कामगिरी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचीम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक, पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने, वैभव सुर्यवंशी, अमोल जगदाळे, नितीन चतुरे, हनुमंत दडस, तात्या कदम, तानाजी ढोले, तुषार नलवडे, कल्पेश काशिद यांनी केली. अधीक तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने करीत आहेत.








