वृत्तसंस्था / जेदाह (सौदी अरेबिया)
रविवारी येथे झालेल्या 2025 च्या एफ-1 ग्रा प्रि मोटार रेसिंग हंगामातील सौदी अरेबिया शर्यतीचे जेतेपद ऑस्ट्रेलियाचा मॅक्लरेन चालक ऑस्कर पिसेट्रीने पटकाविले. या जेतेपदामुळे ग्रा प्रि शर्यतीच्या सर्वंकश विभागात पिसेट्रीने आघाडी घेतली आहे.
2025 च्या एफ-1 रेसिंग हंगामात पहिल्यांदाच सौदी अरेबिया शर्यतीमध्ये विजेता ठरविण्याकरिता पेनल्टीचा वापर करण्यात आला आणि त्यामध्ये पिसेट्रीने बाजी मारली. या शर्यतीत ऑस्कर पिसेट्री आणि आतापर्यंत चारवेळा चॅम्पियनशिप मिळविणारा मॅक्स व्हर्स्टेपन यांच्यात चांगलीच चुरस पहावयास मिळाली. या शर्यतीमध्ये व्हर्स्टेपनने पोल पोझिशन मिळविले होते. पण पिसेट्रीने त्याला शेवटच्या टप्प्यात मागे टाकले. या शर्यतीमध्ये फेरारी चालक चार्लस लेकलिरेक तिसऱ्या स्थानावर राहिला तर लॅन्डो नोरीसने चौथे स्थान मिळविले. गेल्या आठवड्यात पिसेट्रीने बहरीन ग्रा प्रि शर्यत जिंकली होती. चालु वर्षीच्या रेसिंग हंगामात पिसेट्रीने आतापर्यंत पाच पैकी तीन शर्यती जिंकल्या असून तर गेल्या वर्षीच्या रेसिंग हंगामात त्याने दोन शर्यती जिंकल्या होत्या. ग्रा प्रि शर्यतीच्या सर्वंकश जेतेपदासाठीच्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलियाचा पिसेट्री सध्या आघाडीवर आहे. 2010 साली ऑस्ट्रेलियाचा रेडबुल चालक मार्क वेबरने या शर्यतीच्या सर्वंकश विभागात आघाडी मिळविली होती. त्यानंतर असा पराक्रम करणारा पिसेट्री हा दुसरा ऑस्ट्रेलियन चालक आहे. 1980 साली एफ-1 रेसिंगचे एफ-1 जेतेपद ऑस्ट्रेलियाच्या अॅलन जोन्सने पटकाविले होते. त्यानंतर आजपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या एकाही स्पर्धकाला सर्वंकश जेतेपद मिळविता आलेले नाही.









