बेळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असणाऱ्या उपनोंदणी कार्यालयात असणाऱ्या अबकारी उपअधीक्षकांच्या कार्यालयाला पाणीपुरवठाकरणाऱ्या पाईपलाईनला गेल्या अनेक दिवसांपासून गळती लागली आहे. याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेक लिटर पाणी वाया जात आहे. याकडे अधिकारी लक्ष देणार का? असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे. उपनोंदणी कार्यालयात असणाऱ्या अबकारी उपअधीक्षक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या शेजारीच पाईप लाईन घातली आहे. याद्वारे कार्यालयाला पाणीपुरवठा केला जातो. सदर पाईप लाईनला गळती लागून अनेक लिटर पाणी वाया जात आहे. सदर पाणी रस्त्यावर साचून राहात आहे. तेथून होणाऱ्या वाहनांच्या वर्दळीमुळे ये-जा करणाऱ्यांच्या अंगावर पाणी उडत आहे. सरकारी कार्यालयांमध्ये पाणी वाया जात असल्यामुळे नागरिकांतून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
गळतीचे निवारण करण्याची मागणी
या रस्त्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ये-जा करणाऱ्या वाहनधारकांची संख्या अधिक आहे. अशातच गळती लागलेले पाणी वाया जात आहे. एकीकडे पाणी वाचवाचा नारा देणाऱ्या सरकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडूनच या गळती निवारणाकडे दुर्लक्ष केल्याने अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. सदर गळतीचे त्वरित निवारण करावे, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.









