डेनेजच्या समस्येकडे दुर्लक्ष : तातडीने पाईपची दुरुस्ती करण्याची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
आरपीडी क्रॉसजवळ गेल्या दीड-दोन महिन्यांपासून डेनेज आणि पिण्याच्या पाण्याची पाईप दुरुस्त करण्यासाठी खोदाई करण्यात आली आहे. मात्र अद्याप त्याची दुरुस्ती करण्यात आली नसून शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तेव्हा तातडीने याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
आरपीडी क्रॉसजवळील डेनेज पाईप दुरुस्ती करण्यासाठी खड्डा काढण्यात आला आहे. मात्र अद्याप त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. याचबरोबर अजंटा हॉटेल शेजारी पिण्याच्या पाण्याची पाईप फुटून शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. याकडे महापालिका आणि पाणीपुरवठा मंडळाचे साफ दुर्लक्ष झाले आहे. याच परिसरात डेनेजची पाईप देखील फुटली असून त्याची दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे.
या परिसरात नेहमीच वर्दळ असते. तसेच रहिवासी आणि व्यावसायिकही या परिसरात राहतात. त्या सर्वांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्याची पाईप फुटून रस्त्यावरुन पाणी वाहत आहे. त्यामुळे रस्त्यावरुन जाणे देखील कठीण झाले आहे. एकूणच आरपीडी क्रॉस परिसरात अनेक कामे अर्धवट असून ही कामे कधी पूर्ण होणार तसेच दुरुस्तीची कामे देखील तातडीने करणे आवश्यक आहे.









