नाझर कॅम्प, वडगाव येथील सातव्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी महापौर मंगेश पवार यांचा विश्वास
बेळगाव : वैभवशाली परंपरा असलेल्या पायोनियर अर्बन बँकेने आपली शाखा आजपासून माझ्या वॉर्डमध्ये वडगाव येथे सुरू केली, याचा मला आनंद होतो. या भागात ही बँक उल्लेखनीय प्रगती करेल, असा मला विश्वास आहे, असे विचार महापौर मंगेश पवार यांनी बोलताना व्यक्त केले. पायोनियर अर्बन बँकेच्या सातव्या शाखेचे उद्घाटन अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर नाझर कॅम्प, येळ्ळूर रोड, वडगाव येथे बुधवारी सकाळी महापौरांच्या हस्ते फीत सोडून संपन्न झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन प्रदीप अष्टेकर हे होते.
स्मृतीचिन्ह-भेटवस्तू देऊन सन्मान
बँकेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष अनंत लाड यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला. बँकेच्या कार्याचा आढावा घेऊन चेअरमन अष्टेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले आणि पाहुण्यांचा सन्मान केला. संचालकांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह आणि भेटवस्तू देऊन व्यासपीठावरील आणि सभागृहातील मान्यवरांचा सन्मान चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालकांच्या हस्ते करण्यात आला. शाखेच्या आत असलेल्या सेफ डिपॉझिट लॉकर्सचे उद्घाटन डेप्युटी रजिस्ट्रार ऑफ को-ऑप. सोसायटीज रवींद्र पाटील यांनी केले. ट्रेझरीचे उद्घाटन क्रेडाईचे अध्यक्ष युवराज हुलजी यांच्या हस्ते तर लक्ष्मी सरस्वती फोटो पूजन नगरसेविका सारिका पाटील यांनी केले. संगणकांचे उद्घाटन नवहिंद सोसायटीचे चेअरमन प्रकाश अष्टेकर यांनी केले. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन माजी आमदार संजय पाटील यांनी केले. दीपप्रज्वलन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
बँकेत संचालक राहिलेले अनेक जण महापौर, आमदार
बेळगावात सर्वात अगोदर सुरू झालेल्या पायोनियर बँकेची प्रेरणा घेऊन त्यानंतर स्थापन झालेल्या मराठा बँक, तुकाराम बँक आणि आमच्या सोसायटीसारख्या अनेक संस्थांनी तळागाळातील लोकांचे जीवन सुसह्या करण्यासाठी अर्थसाहाय्य केले. या बँकांमुळेच अनेक उद्योजक उभा राहिले. या बँकेला मोठा इतिहास आहे. या बँकेत संचालक राहिलेले अनेक जण नंतर महापौर, आमदार झाले, असे विचार नवहिंदचे चेअरमन प्रकाश अष्टेकर यांनी व्यक्त केले. पायोनियर बँकेने अनेक उद्योजकांना, बिल्डर्सना प्रोत्साहन दिल्यामुळेच त्यांचे उद्योग-व्यवसाय यशस्वी होऊ शकले आणि बँकेची प्रगती झाली, असे मत क्रेडाईचे अध्यक्ष युवराज हुलजी यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन शिवराज पाटील यांनी केले. रणजित चव्हाण-पाटील यांनी आभार मानले. बँकेच्या व्हाईस चेअरमन सुवर्णा शहापूरकर, संचालक गजानन पाटील, यल्लाप्पा बेळगावकर, गजानन ठोकणेकर, मल्लेश चौगुले, मारुती सिगीहळ्ळी, श्रीकांत देसाई, बसवराज इटी, रोहन चौगुले, नितीन हिरेमठ, ज्ञानेश्वर सायनेकर, कमलेश मायाण्णाचे व सीईओ अनिता मूल्या यांच्यासह कर्मचारी वर्ग व निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते. वडगाव शाखेच्या उद्घाटनानिमित्त व्याजदरात पाव टक्के वाढ करण्यात आली असल्याने आज अनेकांनी आपल्या ठेवी ठेवल्या.
सर्व शाखा अधिक कार्यक्षम करण्याकडे कल
माजी आमदार संजय पाटील यांनी पायोनियर बँकेच्या गौरवशाली परंपरेचा उल्लेख केला. प्रदीप अष्टेकर यांच्या कणखर नेतृत्वामुळे बँकेने प्रगतीची मुसंडी मारली. अधिक शाखा वाढविण्यापेक्षा आहेत त्या, सर्व शाखा अधिक कार्यक्षम करण्याकडे त्यांचा कल आहे, असे ते म्हणाले. माजी नगरसेवक मनोहर हलगेकर यांचेही शुभेच्छापर भाषण झाले.









