तवांग संघर्षानंतर प्रकल्पाला वेग ः चीन-तिबेट सीमेजवळ निर्मिती
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्र सरकार अरुणाचल प्रदेशात प्रंटियर हायवे बांधणार आहे. येत्या पाच वर्षांत हा महामार्ग पूर्ण होण्याच्यादृष्टीने प्रकल्पाला गती देण्यात आली आहे. तिबेट-चीन-म्यानमारला लागून असलेल्या भारतीय सीमेच्या अगदी जवळ असलेल्या या महामार्गाच्या बांधकामामुळे लष्कराच्या हालचाली सुलभ होणार आहेत. नुकत्याच तवांग येथे चीन आणि भारतीय सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीच्या पार्श्वभूमीवर हय़ा प्रकल्पाला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आल्याचे समजते. या प्रकल्पासाठी 27 हजार कोटी रुपये खर्च येणार असल्याचे परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
प्रंटियर हायवेचे नामकरण एनएच-913 असे करण्यात आले असून त्याची लांबी 1,748 किमी असल्याचे सरकारी अधिकाऱयांच्या हवाल्याने सांगण्यात आले. या महामार्गाची निर्मिती रस्ते वाहतूक मंत्रालय करत असून सीमावर्ती भागाचा विकास करण्याचा उद्देश नजरेसमोर ठेवण्यात आला आहे. हा महामार्ग बोमडिला येथून सुरू होईल. पुढे तो नाफ्रा, हुरी आणि मोनिगॉन्ग खिंडीतून जाणार आहे. हे 3 पॉईंट्स भारत-तिबेट सीमेच्या अगदी जवळ आहेत. चीन सीमेजवळील जिदो आणि चेनक्वेंटीजवळील पॉईंटमधूनही जाणार आहे. हा संपूर्ण महामार्ग 9 पॅकेजमध्ये विभागला असून भारत-म्यानमार सीमेजवळील विजयनगरपर्यंत जाणार आहे.
स्थलांतर रोखण्यासही मदत
या भागात रस्ता अस्तित्वात नसल्यामुळे हा रस्ता हरित भागात बांधण्यात येणार आहे. त्यावर पूल आणि बोगदेही असतील. या प्रकल्पाचा पूर्ण आराखडा 2024-25 पर्यंत तयार होईल आणि त्याचे बांधकामही येत्या पाच वर्षांत पूर्ण होईल. हे काम 2026-27 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या महामार्गामुळे विकासाला चालना मिळणार आहे. तसेच विशेषतः सीमेजवळ असलेल्या भागातील स्थलांतर थांबण्यासही मदत होणार असल्याचा दावा केला जात आहे.









