महिलांची सुरक्षितता ऐरणीवर : परिवहन खात्याचे दुर्लक्ष : महिला संतप्त
बेळगाव : महिलांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुरू करण्यात आलेली पिंक बस शक्ती योजनेत हरवून गेली आहे. त्यामुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. गतवर्षी जानेवारी दरम्यान मोठा गाजावाजा करून पिंक बस सुरू करण्यात आली होती. मात्र, काही दिवस चालल्यानंतर ही बससेवा स्थगित झाली आहे. त्यामुळे ‘नव्याचे नऊ दिवस’ याप्रमाणे पिंक बसही काही दिवसातच बंद पडली आहे. महिलांचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी गतवर्षी 26 जानेवारी रोजी तीन बसेस सुरू करण्यात आल्या होत्या. दरम्यान महिलांचाही या बससेवेला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे पुन्हा बसेस वाढतील, अशी अपेक्षा होती. मात्र, काही दिवसातच या बसेस बंद झाल्या आहेत. महिलांना सुरक्षितता मिळावी किंवा प्रवासादरम्यान महिलांची छेडछाड करण्याचे प्रकार घडतात. यासाठी ही बससेवा सुरू करण्यात आली होती.
कंडक्टरही महिलाच
या पिंक बसमध्ये महिलांसाठी सर्व सीट राखीव होत्या. त्यामुळे प्रवास करणे सोयीस्कर होत होते. विशेषत: सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत नोकरी आणि व्यवसायासाठी जाणाऱ्या महिलांना ही बस आधार ठरत होती. शहरातील विविध मार्गांवर या तीन बसेस सोडण्यात आल्या होत्या. मात्र, सध्या बससेवाच बंद झाल्याने महिलांना सार्वजनिक बसेसने प्रवास करावा लागत आहे. विशेषत: या बसमध्ये वाहक म्हणून महिला कंडक्टरचीच नेमणूक करण्यात आली होती. त्यामुळे महिलांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होत होता.
महिलांचा धक्के खात प्रवास
तरुणी आणि महिलांना या बसमुळे सुरक्षितता मिळत होती. त्यामुळे महिला या पिंक बसलाच अधिक पसंती देत होत्या. मात्र, बससेवाच बंद झाल्याने चेंगराचेंगरीने सामान्य बसमधून प्रवास करावा लागत आहे. जूनपासून शक्ती योजना सुरू झाली आहे. त्यामुळे महिला प्रवाशांच्या संख्येत दुप्पटीने वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत पिंक बससेवा महिलांना अधिक उपयुक्त ठरली असती. मात्र, बससेवा बंद झाल्याने सर्वसामान्य बसमधून महिलांना धक्के खात प्रवास करावा लागत आहे.
पुन्हा पिंक बस सुरू करणार
गतवर्षी सुरू करण्यात आलेल्या पिंक बसला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. शिवाय महिला इतर बसनेदेखील प्रवास करत होत्या. त्यामुळे पिंक बस काही वेळेला रिकाम्या फिरवाव्या लागत होत्या. मात्र, महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पुन्हा पिंक बस सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.
– ए. वाय. शिरगुप्पीकर (डेपो मॅनेजर)









