राजस्थानात काँग्रेसमधील मतभेद पुन्हा समोर
वृत्तसंस्था/ जयपूर
राजस्थानात काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी पुन्हा एकदा स्वतःच्या पक्षाच्याच सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पायलट यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना लक्ष्य केले. मुख्यमंत्री गेहलोत यांच्याकडे भाजप नेत्या तसेच माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या विरोधात तक्रार केली होती. परंतु गेहलोत यांनी कुठलीच कारवाई केली नसल्याचे म्हणत पायलट यांनी 11 एप्रिल रोजी जयपूर येथे एक दिवसीय उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे.
वसुंधरा राजे यांच्या सरकारच्या काळात झालेल्या भ्रष्टाचारावर कारवाई करण्यात आली नाही. विरोधी पक्षात असताना काँग्रेसने चौकशी करविण्याचे आश्वासन दिले होते. विधानसभा निवडणुकीला 6-7 महिने शिल्लके असताना संगनमताचा आरोप अन्य पक्षांकडून केला जाऊ शकतो. हा आरोप होऊ नये म्हणून लवकर कारवाई करावी लागणार आहे. पक्षनेतृत्वाच्या बोलण्यात अन् कृतीत फरक नसल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांना दाखवून द्यावे लागणार असल्याचे पायलट यांनी म्हटले आहे.
वसुंधरा राजे सरकारच्या काळात 45 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे काँगेसकडून म्हटले गेले होते. तसेच सत्तेवर येताच या घोटाळय़ांप्रकरणी निष्पक्ष चौकशी करत दोषींना शिक्षा मिळवून देणार असल्याचे आश्वासन दिले होते अशी आठवण पायलट यांनी पत्रकार परिषदेत करून दिली आहे.
द्वेषपूर्ण कारवाईची मागणी मी कधीच केलेली नाही, परंतु आमच्या पक्षाची विश्वासार्हता कायम ठेवावी लागेल. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना 28 मार्च 2022 रोजी यासंबंधी पहिले पत्र लिहिले होते. त्यावर त्यांच्याकडून कुठलेच उत्तर मिळालेले नाही. मग दुसरे पत्र लिहिले, त्यावरही कुठलाच प्रतिसाद मिळाला नसल्याचा दावा पायलट यांनी केला आहे.
वारंवार सत्तेवर येऊनही आम्ही विरोधी पक्षात असताना जे आरोप करतो, त्यावर कुठलीच कारवाई करत नाही. आम्ही पुन्हा निवडणुकीला सामोरे जाऊ नये तेव्हा आमच्या आश्वासनांवर लोकांनी विश्वास ठेवावा याकरता वसुंधरा राजे विरोधात कारवाई करणे गरजेचे असल्याचे पायलट यांनी म्हटले आहे.
अशोक गेहलोत यांनीही राजे यांच्यावर आरोप केले होते. निष्पक्ष चौकशी होत नाही तोवर दोषी कोण हे कसे कळणार? चौकशीत कुणीच दोषी नव्हते असा निष्कर्ष प्राप्त झाल्यास आम्ही दोघेही खोटं बोललो होतो असे मान्य करू. जोपर्यंत एखादा गुन्हा नोंदविला जात नाही तोवर आम्ही केलेले आरोप खरे की खोटे हे लोकांना कसे कळणार असे प्रश्नार्थक विधान पायलट यांनी केले आहे.









