राजस्थानाचे माजी उपमुख्यमंत्री व काँग्रेसचे युवा नेते सचिन पायलट यांनी पुन्हा एकदा बंडाचे निशाण फडकविल्यामुळे पुढच्या काही दिवसांत या राज्यात अनेक राजकीय उलथापालथी घडण्याची चिन्हे आहेत. राजस्थानात 2018 पासून काँग्रेसचे सरकार असून, अशोक गेहलोत यांच्या हाती राज्याचे नेतृत्व आहे. तथापि, गेहलोत व पायलट यांच्यातून साधा विस्तवही जाताना दिसत नाही. या दोघांमधील वादावर कायमस्वऊपी तोडगा काढण्यात पक्षश्रेष्ठींना यश न आल्याने आता त्याची परिणती काँग्रेसमध्ये फूट पडण्यात होण्याची दाट शक्यता वाटते. खरे तर दोघांमधील संघर्षाचे मूळ, हे केवळ मुख्यमंत्रिपदात आहे. पायलट यांची मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. कोणत्याही परिस्थितीत या पदावर विराजमान होण्याची मनीषा ते बाळगून आहेत. तर गेहलोत यांना काहीही झाले, तरी या पदावरून हटायचे नाही, अशी स्थिती आहे. मागच्या काही वर्षांतील या दोघांच्या वेगवेगळ्या भूमिकांवर नजर टाकली, तर त्यातून या साऱ्यावर प्रकाश पडतो. गेल्या पाच वर्षांत पायलट यांनी अनेकदा बंडाचा पवित्रा घेतल्याची उदाहरणे पहायला मिळतात. उपमुख्यमंत्रिपदावर असताना काही आमदारांसह दिल्ली गाठत गेहलोत यांना पदावरून खाली खेचण्याचा प्रयत्नही त्यांनी करून पाहिला होता. मात्र, राहुल गांधी यांनी समजूत काढल्यानंतर त्यांनी आपली तलवार म्यान केली होती. याचदरम्यान पक्ष फोडून भाजपाच्या मदतीने मुख्यमंत्रिपदावर स्वार होण्याचीही पायलट यांची योजना होती. तथापि, पुरेसे आमदार पाठीशी नसल्याने हा प्लॅन त्यांना गुंडाळावा लागल्याचे सांगितले जाते. अर्थात पक्ष व आमदारांवरील पकड, मुत्सद्दीपणा व वेळीच संकट ओळखण्यासाठी आवश्यक असलेली सूक्ष्मता हे गेहलोतांचे विशेष गुणही त्यासाठी कारणीभूत ठरल्याचे दिसते. त्यानंतरही दोघांमधील कुरबुरी थांबल्या नव्हत्या. तथापि समित्या व तत्सम मलमपट्ट्या करीत काँग्रेसकडून वेळकाढूपणा करण्याचेच धोरण अवलंबिण्यात आले. एका बाजूला गेहलोत यांचे पद कायम ठेवतानाच पायलट यांनाही मुख्यमंत्रिपदाचे गाजर दाखविण्यात आले. राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा ऐन भरात असतानाच्या काळात काँग्रेस अध्यक्षपदावर गेहलोत यांची निवड करून पायलट यांना मुख्यमंत्रीपद देऊन तोडगा काढण्याचाही काँग्रेसचा प्रयत्न होता. मात्र, पक्षाध्यक्षपदापेक्षा राज्याचे नेतृत्व करण्यातच गेहलोत यांना अधिक रस असल्याचे पहायला मिळाले. काँग्रेसच्या 102 पैकी 82 गेहलोत समर्थक आमदारांनी राजीनाम्याचे हत्यार उपसल्याने पेच निर्माण झाल्यानंतर पक्षाने मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावावर शिक्कोमार्तब केले. या उपरान्त ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान गेहलोत व पायलट यांच्यातील मतभेद निवळल्याचे वातावरण तयार करण्यात आले असले, तरी तो केवळ दिखावा असल्याचे आता सिद्ध झाले आहे. किंबहुना या खेपेला पायलट यांची भूमिका ‘आर या पार’ची असावी. आधी स्वत:च्याच पक्षाच्या नेतृत्वाविरोधात उपोषण आणि त्यानंतर जनसंघर्ष यात्रेला केलेली सुऊवात बघता ते आक्रमक मूडमध्ये असल्याचा दुजोरा मिळतो. कोणतीही यात्रा हे संबंधित नेत्याचे नेतृत्व सिद्ध करण्याचा प्रशस्त मार्ग असतो. या यात्रेला मिळणारा प्रतिसादच त्या नेत्याचे नेतृत्व ठरवित असतो. म्हणूनच जनतेत जाऊन आपले वजन वाढविण्याचा मार्ग पायलट यांनी स्वीकारला असावा. यातून आपले प्रतिमा संवर्धन करण्याचाही त्यांचा प्रयत्न असेल. यात्रेदरम्यानच्या त्यांच्या भाषणांतून बरेच काही स्पष्ट होते. पेपरफुटीसह वेगवेगळ्या गैरप्रकारांबरोबरच भाजपा काळातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणात निष्क्रियता दाखविल्याच्या मुद्द्यावरून ते गेहलोत सरकारविरोधात तुटून पडताना दिसतात. यातून काँग्रेस व भाजप दोघांच्या राजवटी कशा भ्रष्ट आहेत, हेच दाखविण्यावर त्यांचा फोकस असावा, असे म्हणायला जागा आहे. तसे असेल, तर गेहलोत स्वतंत्र पक्ष तर काढणार नाहीत, या शक्यतेची पाल मनात चुकचुकल्याशिवाय राहत नाही. अनेकदा बंड करूनही काँग्रेसकडून दखल घेतली जात नाही. गेहलोत असेपर्यंत आपल्याला वाव मिळणे शक्य नाही. याची त्यांना खात्री पटली असावी. राजस्थानची निवडणूक तोंडावर आली आहे. ही निवडणूक भाजपा विरूद्ध काँग्रेस, अशीच राहणार, हे वेगळे सांगायला नको. भाजपासारख्या पक्षाला पायलटांसारखा तऊण व लोकाश्रय असलेला नेता नक्कीच हवा असेल. तथापि, पक्षांतर केलेल्या नेत्याला ते लगेच मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करतील, हे संभवत नाही. या सगळ्या बाबी ध्यानात घेऊन आपले विमान अधिकाधिक उंच उडवून राजस्थानच्या वाळवंटात एक नवा पर्याय उभा करता येईल का, याची चाचपणी पायलट करत असावेत. मात्र, हा संघर्ष दिसतो, तितका सोपा नक्कीच नसेल. त्याकरिता त्यांना प्रचंड परिश्रम करावे लागतील. राज्यात काँग्रेस व भाजपा हे दोन्ही पक्ष प्रबळ पक्ष आहेत. आलटून पालटून दोन्ही पक्षांकडे सत्तेचा लंबक येथे झुकत असतो. तसा मागच्या काही वर्षांतील ट्रेंड आहे. किंबहुना, पायलट यांच्या भूमिकेमुळे राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण होऊ शकतो. ते भाजपाचा रस्ता धरणार, काँग्रेसला आपली दखल घ्यायला भाग पाडणार की स्वतंत्र पक्षाची वाट चोखाळणार, याबाबत औत्सुक्य आहे. त्यांनी कोणताही मार्ग स्वीकारला, तरी त्याचे राजस्थानच्या राजकारणावर निश्चित परिणाम होतील. गेहलोत, वसुंधराराजे यांचे रोलही उत्कंठावर्धक असतील. आज कर्नाटकचा निकाल आहे. तेथे काँग्रेस व भाजपा यांच्यापैकी कुणाची सरशी होईल, हे दुपारपर्यंत कळू शकेल. या निकालाचे परिणाम राजस्थानसारख्या राज्यावर तसेच पायलट यांच्या भूमिकेवर होणार काय, याकडेही संबंध देशाचे लक्ष असेल.
Previous Articleकोइम्बतूरमध्ये दिसला दुर्लभ पांढरा कोब्रा
Next Article श्रवण… भाग 3
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








