बेळगाव :
झाडशहापूर येथील जागृत देवस्थान श्री ब्रह्मलिंग देवाची यात्रोत्स रविवार दि. 15 रोजी होणार आहे. सालाबादप्रमाणे प्रत्येक वर्षी घटस्थापनेदिवशी यात्रोत्सव असतो. त्यानिमित्त गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी देवाची पालखी खानापूर येथील श्री मलप्रभा नदीत स्नान घालून विधिवत पूजा, प्रसाद करून सायंकाळी पळतच युवक घेवून येतात. आणि गावातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात वस्तीला ठेवतात व संपूर्ण रात्रभर जागर, भजन, पूजा-अर्चा चालू असते. रविवार दि. 15 रोजी सकाळी वाजतगाजत मिरवणुकीने श्री ब्रह्मलिंग मंदिराकडे पालखी निघते. त्यावेळी संपूर्ण गाव त्या मिरवणुकीमध्ये सहभागी असतो. मंदिरात विधीवत पूजा-अर्चा झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन प्रत्येक वर्षाप्रमाणे यावर्षीही केलेले आहे. तरी परिसरातील भाविकांनी यात्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे देवस्थान पंच कमिटीने कळविले आहे.









