आयुष्यातील सोनेरी संध्याकाळ किंवा अपरिहार्यपणे येणारे वृद्धत्व ही आनंददायी, सुखकारक ठरणे हे भाग्य यावे, असे वाटत असले तरी ते तसे फार कमी लोकांच्या वाट्याला येते. शारीरिक व्याधी, दुर्बलता यासोबत मानसिक व आर्थिक तणावाचे वृद्धत्व हे अनेकांचे वास्तव हे मोठे आव्हान ठरणार, याची स्पष्ट जाणीव लोकसंख्या रचना बदलाच्या अभ्यासातून पुढे येत आहे.
वाढत्या वृद्ध लोकसंख्येस सांभाळणे ही जागतिक वृद्धत्व समस्या 2050 पर्यंत अतिशय गंभीर होणार आहे. कारण 2050 मध्ये तरुण लोकसंख्येपेक्षा वृद्ध लोकांचे प्रमाण अधिक असणार आहे! यात अर्थातच भारताची वृद्ध लोकसंख्या पहिल्या क्रमांकावर असणार हे स्पष्ट आहे. या प्रचंड मोठ्या परावलंबी लोकसंख्येस आवश्यक आरोग्य सेवा. इतर सुविधा-सवलती याबाबत राष्ट्रीय पातळीवर आणि वैयक्तिक पातळीवर महत्त्वपूर्ण उपाययोजना आवश्यक ठरतात. वृद्धांचे किंवा ज्येष्ठ नागरिकांचे अर्थपूर्ण जीवन दयेच्या, मदतीच्या आधारावर न राहता ते सन्मान, स्वावलंब व आनंददायी होण्यास राष्ट्रीय व वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करावे लागतील.
ज्येष्ठांच्या संख्येत वाढ
सध्या भारताची लोकसंख्या ‘तरुण’ असल्याने आपण जागतिक स्तरावर आवश्यक असणारे मनुष्यबळ पुरवठा करणारे होऊ शकतो, असा ‘लोकसंख्येचा लाभांश’ अनेकवेळा मांडला जातो. यातील वास्तव मात्र वेगळेच आहे. यातील महत्त्वाचा आव्हानात्मक भाग जेव्हा ही लोकसंख्या दोन ते तीन दशकानंतर ‘ज्येष्ठ’ गटात समाविष्ट होईल तेव्हा अडचणीचा ठरणारा आहे. वयाच्या 60 नंतरचे ज्येष्ठ व 80 नंतरचे अति ज्येष्ठ यांची संख्या वेगाने वाढत असून वैद्यकीय सुविधा व राहणीमान यातील सुधारणामुळे सरासरी आयुर्मान 70 पर्यंत पोहचले आहे. 1951 मध्ये वृद्धांची (60+)असणारी 2 कोटी संख्या 2011 मध्ये 10 कोटी, 2021 मध्ये 14 कोटी झाली असून यात 6.7 कोटी पुरुष तर 7.1 कोटी महिला आहेत. वाढत्या वृद्ध लोकसंख्येने 15-59 या वयोगटाच्या कर्त्या लोकसंख्येवर (प्रति 100) असणारे परावलंबन प्रमाण 1961 मध्ये 10 टक्के होते ते आता 16 टक्के झाले असून 2031 पर्यंत 20 टक्के होणार आहे. केवळ पुढच्या 10 वर्षात वृद्ध लोकसंस्था 40 टक्क्यांनी वाढणार आहे. एकूण लोकसंख्या 2000 ते 2050 या काळात 56 टक्के वाढेल तर साठीपार असणारे 320 टक्के व अति ज्येष्ठांचे (80+) 700 टक्क्यांनी वाढणार आहे! ही संस्थात्मक स्थिती निश्चितच चिंताजनक आहे!
ज्येष्ठांसाठी राष्ट्रीय धोरण व सवलती
भारतीय ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक सुविधा, मदत उपलब्ध व्हावी यासाठी 2011 मध्ये राष्ट्रीय धोरण जाहीर करण्यात आले. वृद्धांना त्यांच्या कुटुंबातच आनंददायी जीवन जगता यावे या प्रयत्नासोबतच अनेक संस्थात्मक पद्धतीने मदत देण्याचा प्रयत्न होत आहे. ज्येष्ठांना आर्थिक स्थैर्य असावे या भूमिकेतून बचत व गुंतवणुकीच्या योजनांवर अधिक व्याज देणे, पेन्शन देणे, प्रवासास सवलतीचे दर आकारणे, आयकर सवलत, आजारपणात सहाय्य अशा प्रकारची मदत दिली जाते. हे प्रमाण गरजेच्या मानाने अत्यल्प असून ग्रामीण भागात राहणारे 71 टक्के वृद्ध याचा फारसा फायदा घेऊ शकत नाहीत. महिला वृद्धांचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक असून त्यांना मदतीची मोठी आवश्यकता आहे. आधुनिक जीवनशैली, शहरीकरण, ढासळती कुटुंब रचना यातून वृद्धांच्या समस्या आर्थिक, सामाजिक, मानसिक अशा सर्व बाजुंनी गुंतागुंतीच्या होत असून याबाबत केवळ मलमपट्टीचे धोरण आहे. ज्येष्ठांच्या संघटना अधिक प्रभावी करणे व त्यातून धोकादायक दबाव ठेवणारी यंत्रणा उभी राहणे यासाठी प्रयत्न करावे लागतील. वृद्ध हे मोठे सामाजिक भांडवल आहे याचा विसर पडणे परवडणारे नाही!
अर्थपूर्ण ज्येष्ठत्वाकडे…
वृद्धत्व ही समस्या न ठरता जीवन आनंदपूर्ण, अर्थपूर्ण करण्यासाठी सामाजिक व अधिक प्रमाणात वैयक्तिक पातळीवर प्रयत्नांची आवश्यकता आहे. यासाठी आरोग्य आणि पैसा सांभाळणे महत्त्वाचे ठरते. या बाबत केलेली चूक मोठे नुकसान करू शकते. त्यासाठी महत्त्वाचे आर्थिक नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक ठरते. साधारणपणे साठीनंतर पैलतिराकडे लक्ष अधिक गेल्याने हाती असणारा पैसा, मालमत्ता मुलांना, नातेवाईकांना देण्याची घाई केली जाते. हे कटाक्षाने टाळणे आता महत्त्वाचे आहे. कारण आपली आर्थिक बाजू भक्कम नसेल तर नटसम्राटचा तिसरा अंक दिसू लागतो. आपल्यासोबत असणारी सोबतीण आणखी अधिक काळ जगणार असल्याने किमान 90 आयुष्य गृहित धरून अर्थनियोजन हवे. केवळ मुलांचा व्यवसाय, उच्च शिक्षण यासाठी आपली आयुष्यभराची कमाई न देता त्यांना कर्ज घेऊन स्वत: जोखीम घेण्यास प्रवृत्त करणे अधिक व्यवहार्य ठरते! सेवा निवृत्तीनंतर मिळणारी मोठी रक्कम घरदुरुस्ती, मोठी गाडी किंवा प्रॉपर्टी यात गुंतवल्याने गुंता होण्याची शक्यता असते. हे टाळून सुरक्षित परतावा देणाऱ्या योजनात गुंतवल्यास आर्थिक स्थैर्य, विशेषत: रोखता प्रवाह (कॅश फ्लो) योग्य राहतो. आपला फ्लॅट, बंगला आता उलटगहाण (Rाना श्दुग्हु) पद्धतीने बँका घेत असून वृद्धापकाळात आवश्यक खर्च चालवण्यास उपयुक्त पर्याय आहे. गुंतवणुकीबाबत नवे, सुरक्षित कार्यक्षम पर्याय म्युचल फंडात उपलब्ध असून त्यासाठी तज्ञांचा सल्ला घेऊन निर्णय घ्यावा. विशेषत: अनेक ठिकाणी गुंतागुंतीच्या गुंतवणुकी न करता सहज सोप्या व आपल्या नंतरच्या ‘तिला’ त्रासदायक न ठरणारे गुंतवणूक पर्यायच निवडावेत व या टप्प्यात शक्यतो कोणाच्या जामिनास, हमीस आपली बांधिलकी नसावी. आर्थिकदृष्ट्या स्वायत्त, स्वतंत्र आनंदी जीवनाचा पाया असून योग्य मदत, दानधर्म, पर्यटन यात संतुलित जीवन हेच ‘सोनियाचे दिन’ आपण नियोजनबद्ध पद्धतीने निर्माण करू शकतो. वृद्धापकाळाचे अर्थनियोजन तरुणपणातच करायचे असते हे न विसरता आपली अर्थपूर्ण सेकंड इनिंग सामाजिक कामास दिल्याने वेळेचाही उपयुक्त वापर होतो. आपण म्हातारे नव्हे तर समाजाचे ‘महा-तारे’ आहोत अशी भूमिका आपला व इतरांचा आनंद वाढवेल!
(टीप ऑक्टोबर महिना ‘आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार जागरुकता’ असून ज्येष्ठांचे अर्थकारण ही महत्त्वाची दुर्लक्षित बाब लेखात स्पष्ट केली आहे.)
– प्रा.डॉ. विजय ककडे








