तीरथ को सब करे
देवपूजा करे
वासना ना मरे
कैसे भव तरें?
ज्यांचे स्वर म्हणजेच तीर्थ अशा पं. भीमसेन जोशी यांच्या स्वरात ही बंदिश ऐकणं म्हणजे एखाद्या कुशल शिक्षकाच्या तोंडून विषयाचं सुलभरंजक रूप ऐकण्यासारखं आहे. परवाच सुप्रसिद्ध गायक श्री अजित कडकडे यांचं गाणं ऐकण्याचा योग आला. मध्यंतरातील त्यांच्या बोलण्यात असं आलं की बाहेरून कितीही देवदेव केलं आणि ती भावना आतून आलेली नसेल तर काय उपयोग? मनात आलं खरंच की! माणसं अक्षरश: नाक मुठीत धरून देवापुढे बसतात.
तासनतास जप करतात. फुलांचे लक्ष वाहतात, शेकड्यांनी व्रतवैकल्यं करतात, स्वामींच्या बैठका करतात आणि वागतात असं विचित्र, की यांचं काय करावं बरं, असा प्रश्न पडतो. आपले साधुसंत अक्षरश: शाब्दिक चपराकी मारून मारून समाजाला जागं करीत आलेले आहेत पण आपण अजून जागे व्हायला तयार नाही. स्वरांचं साक्षात दर्शन झालेली पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांच्यासारखी माणसं अपरात्री विचार करता करता
अरे तू जागत रहियो मनुवा तू जागत रहियो
मान ले मोरी बात
जग झूठा सब माया झूठी कोई नहीं तेरा
ये जग में, अरे तू जागत रहियो..
सारखी अप्रतिम बंदिश घडवून जातात. भल्या पहाटेची वेळ असणारा अहिरभैरव त्यांनी यासाठी निवडला. आणि हा अत्यंत महत्त्वाचा संदेश जगाला देण्यासाठी परमात्म्याने त्यांच्या कंठाची निवड केली कारण ते व्यक्तिमत्त्व तसं ऋषितुल्य होतं म्हणतात. पण त्यांनी ज्या तीव्र भावनेनं ती घडवली तितक्याच तल्लीनतेने गाणारे किती जण असतील? खरं तर गायक म्हणून ती चीज अतिउत्तम गाणारी खूप माणसं असतीलही. पण त्यात जे सांगितलं आहे ते त्यांना कधी मनाच्या तळापासून जाणवलं असेल?
प्रश्न कडू आहे आणि उत्तर बाकं आहे. काही गाणी इतकी मार्मिक असतात. आता हेच उदाहरण पहा ना
सुख देवासी मागावे, दु:ख देवाला सांगावे
देव मागे देव पुढे देव आहे चोहीकडे
डोळे मिटुनी बघावे, सुख देवासी मागावे.
इतकं स्पष्ट सांगितलं आहे. आपला खराखुरा सगासोयरा तो एक परमेश्वर आहे. एरवी
माझं दु:ख माझं दु:ख तळघरात कोंडलं
असंच करावं लागतं. पण तरीही माणूस सुधारत नाही. भावनेपोटी नको तिथे नको ती गोष्ट मोकळी करून सांगितली जाते. आणि त्या जखमांवर जग मीठच झोंबवत असतं. शांतपणे झोपाळ्यावर बसून कबीर ऐकावा, तोही किशोरीताईंच्या स्वरांतून उतरत येणारा.
घट घट में पंछी बोलता
आप ही डंड़ी आप तराजू
आप ही बैठा तोलता
कहत कबीर सुनो भई साधु
मन की घूँडी खोलता.
तो असतो. खरंच असतो आपल्या आसपास. आपल्या देहात, मनात, अस्तित्त्वात पसरून रुजून राहिलेला असतो. कधी उमलत्या फुलासोबत फुलवतो तर कधी तानपुऱ्यासोबत झंकारतो. रस्त्यावरच्या भुकेल्या अनाथ पोराला कधी मायेनं घास भरवलाय? त्याच्या चेहऱ्यावर घासाघासागणिक फुलून येणारी तृप्ती पाहिलीय कधी? पाहिली असेल तर मग त्याला शोधायला जायची गरजच नाही. तो तुमच्याकडे येऊन तुम्हाला तपासून गेला.
दान केले तर या कानाचं त्या कानाला पत्ता लागता कामा नये. आणि लोक ट्यूबलाईटपासूनच्या देणग्यांवर नांव घालावं म्हणून अडून बसतात तेव्हा हसूही येत नाही आणि रागही येत नाही. काय बोलावं? तीरथ को… म्हणजे आपण दान करून कोणावर उपकार करतो काय? अजिबातच नाही. आपल्याला त्या जगन्नियंत्याने जे काही भरभरून दिलं त्याची कृतज्ञता म्हणून करायचं असतं ते. अनाथ, दु:खी असणारी आपलीच भावंडं आहेत. देवाची लेकरं आहेत. मग स्वत:च्या भावंडांसाठी काही केलं तर जाहिरात प्रसिद्धी कशाला लागते? पण म्हणतात ना,
काहे वाराणसी काहे रामेसर
दु:ख न समझे दूजा,
अंदर पशुवत बाहर करे व्रत
कैसन पावे पूजा?
असं असतं आमचं वागणं.
देव बोलतो बाळमुखातून
देव डोलतो उंच पिकातून
कधी होउनी देव भिकारी
अन्नासाठी आर्त पुकारी
अवतीभवती असून दिसेना शोधितोस आकाशी असं पाडगावकर म्हणतात. बाबूजींच्या भिजल्या स्वरातलं हे गीत म्हणजे देव नक्की काय आणि कुठे आहे याची आतून उमलून आलेली जाणीव आहे. एक शहाणीव आहे. संत एकनाथांना शांतीब्रह्म म्हणतात कारण शांती आणि ब्रह्म दोन्ही उमगलं होतं त्यांना. म्हणून मेहनतीने कावड भरून रामेश्वरावर वाहायला आणलेली गंगा त्यांनी तहानलेल्या गाढवाच्या तोंडात रिती केली. त्यांच्या या प्रेमभक्तीची मोहिनी साक्षात हरीला पडली आणि त्याची स्वारी श्रीखंड्या या गोड नावाने नाथाघरी राबली. ये अंतर की बात हैं! अजूनही नाथांच्या वाड्यात हाताला लोण्याचा चिकटपणा, धुतल्यावरही स्पष्ट जाणवून देणारी ती गोजिरी मूर्ती आहे. हा आटापिटा खुद्द देवाने केला तो कशासाठी, तर बाबांनो नुसती तीर्थे आणि पूजा करत फिरू नका. खरा घोळ आतूनच सुरू होतो.
पुण्य परउपकार पाप ते परपीडा
आणिक नाही जोडा दूजा तयासी
पुन्हा एकदा पं. भीमसेन जोशी यांच्याच स्वरात हा अभंग आपल्याला ऐकायला मिळतो. पाप आणि पुण्य यांची सोपी सुटसुटीत व्याख्या तुकोबांनी केलीय. जे केल्यावर आतून निर्मळ आनंद होतो ते देवाचंच रूप असतं. आणि हे कळण्यासाठी आतूनच मन स्वच्छ असावं लागतं. नाहीतर मग नाही निर्मळ मन… असं होतं. माणसं धाव धाव धावून विश्वरूप पाहायला जातात आणि स्वरूप विसरतात. माणसं देवदेव करतात आणि घरात येणाऱ्या प्राण्यांना, माणसांना वाईट वागणूकदेतात.
माणसं आम्ही शांतीप्रिय आहोत असं म्हणतात आणि एकीकडे माणसांवर अत्याचार करणं हीच देवाची आज्ञा समजतात. आणि आम्ही देवाचे पाईक आहोत असं म्हणतात. देवाचे खरे पाईक तर अबोलपणे माणसांना मदत करत शांतपणे काम करत असतात. म्हणून मग परत म्हणावंसं वाटतं. तीरथ को सब करे देवपूजा करे..
-अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु








