बेळगाव : शिवाजीनगर येथील बोळांमध्ये वेळच्यावेळी कचरा उचल केला जात नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. साचलेला कचरा आणि मातीच्या ढिगाऱ्यांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. महापालिका कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली असता उलट नागरिकांशी वाद घालण्याचे प्रकार घडत असल्याने स्थानिक नागरिक संतापले आहेत. दुसरी व तिसरी गल्ली शिवाजीनगर येथील बोळांमध्ये गटारी तुंबल्या असून, मातीचे ढिगारे पसरले आहेत. वर्षभरापूर्वी तक्रार केल्यानंतर स्वच्छता करण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत कोणतीच स्वच्छता करण्यात आलेली नाही. काही ठिकाणी घुशींनी गटारीत माती काढल्याने सांडपाणी थांबले आहे. यामुळे डासांची पैदास वाढली असून, रोगराई वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्वच्छता न केल्यास आंदोलनाचा इशारा
वेळच्यावेळी घरपट्टी तसेच महापालिकेचा कर भरून देखील स्वच्छता होत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. महापालिकेने या बोळातील स्वच्छता न केल्यास नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.









