सर्व्हेसाठी गेलेल्या रेल्वे खात्याच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी पिटाळले
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव-धारवाड रेल्वे मार्गासाठी भूसंपादन करण्याकरिता गेलेल्या रेल्वे खात्याच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी पिटाळून लावले. कोणत्याही परिस्थितीत पिकाऊ जमीन संपादन करु देणार नाही. पर्यायी खडकाळ जमिनीतूनच रेल्वेमार्ग करावा, अशी मागणी करत शेतकऱ्यांनी जोरदार विरोध दर्शवून भूसंपादन बंद पाडले. तर घटनास्थळी दाखल झालेल्या खानापूरच्या तहसीलदारांना जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे निवेदन दिले.
बेळगाव-धारवाड रेल्वे मार्गासाठी भूसंपादन करण्याकरिता पोलीस बंदोबस्तात रेल्वे खात्याचे अधिकारी गर्लगुंजी येथे दाखल झाले होते. खानापूर येथील पोलिसांकडून त्यांना बंदोबस्त देण्यात आला होता. मोठा फौजफाटा घेऊन दाखल झालेल्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना भीक न घालता गर्लगुंजी, नंदिहळ्ळी, नागेनट्टी, के. के. कोप्प येथील शेतकऱ्यांनी सर्व्हे करण्यास कडाडून विरोध केला. यावेळी पोलीस व शेतकऱ्यांमध्ये बराचवेळ वादावादी झाली. सर्व्हे करण्यापासून अधिकाऱ्यांना रोखणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला होता. मात्र शेतकऱ्यांनी याला न जुमानता सर्व्हे करण्यास विरोध कायम ठेवला.
बराचवेळ या कारणावरुन रेल्वे खात्याचे अधिकारी, पोलीस व शेतकऱ्यांमध्ये वादावादी झाली. दरम्यान शेतकऱ्यांनी पिकाऊ जमिनी ऐवजी खडकाळ जमिनीतून दर्शविलेल्या पर्यायी मार्गातून रेल्वेमार्ग काढण्यात यावा, अशी मागणी केली. रेल्वे खात्याकडून करण्यात आलेल्या सर्व्हे नुसार यामध्ये मोठ्या प्रमाणात पिकाऊ जमिन जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. तर शेकडो एकर जमिनीतील ऊस पिक घेता येणार नाही. तसेच अनेक कुपनलिका व पाण्याचे स्त्राsत्र नाहीशे होणार आहेत. तर शेतकऱ्यांनी जावे कोठे? असा प्रश्न उपस्थित करुन अधिकाऱ्यांसमोर शेतकरी व रेल्वे खात्याच्या अधिकाऱ्यांकडून खडकाळ जमिनीतून करण्यात आलेला पर्यायी मार्ग दाखविण्यात आला. यावर अधिकाऱ्यांनी नमते घेतले. इतक्यात खानापूरचे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देवून शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी अधिकाऱ्यांनी चर्चा करुन सर्व्हे करण्याचे काम थांबविले.
शेतकऱ्यांनी दाखविलेल्या पर्यायी मार्गावर विचार करण्यात यावा. यानंतरच कृती करावी. पिकाऊ जमीन कोणत्याही परिस्थितीत देणार नाही. अन्यथा नियोजित प्रकल्पाला प्रखड विरोध करण्यात येईल, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला. शेतकऱ्यांनी सुचविलेल्या दुसऱ्या पर्यायी मार्गासाठी 80 टक्के जमीन खडकाळ आहे. यामुळे शेतकऱ्यांना याचा अधिक फटका बसणार नाही. या भागातूनच रेल्वेमार्ग केल्यास शेतकऱ्यांच्या हिताचे ठरणार आहे. यावर विचार करुन निर्णय घ्यावा. पिकाऊ जमीन संपादन करण्यास कायम विरोध असणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
यावेळी संजय मादार, नंदिहळ्ळी ग्राम पंचायत उपाध्यक्ष मल्लिकार्जुन लोकूर, प्रसाद पाटील, राजेंद्र पाटील, परशराम जाधव, किरण लोंढे, रमेश राऊत, गजानन जाधव, मारुती राऊत, हणमंत मेलगे, पुंडलिक मेलगे, यशवंत पाटील, सोमनाथ पाटील, कल्लाप्पा लोहार, महेश पाटील, संतोष पाटील, भूजंग धामणेकर आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









