शेतकऱ्यांना मोठा फटका : वनखात्याचे दुर्लक्ष : पिकाचा पंचनामा करण्याची मागणी
बेळगाव : बेकिनकेरे येथील डोंगर पायथ्याशी असलेल्या शिवारात जंगली डुकरानी हैदोस घालून रताळी पिकाचे मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी हतबल झाले असून, पिकाचा पंचनामा करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मागील काही दिवसांपासून डोंगरालगत असलेल्या शिवारात वन्य प्राण्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. गवी रेडे, डुक्कर, साळिंद्र, मोर आदी वन्यप्राण्यांचा धुमाकूळ सुरू आहे. परिणामी रब्बी हंगामातील पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सुनील गावडे, गावडू गावडे, नागेंद्र गवळी, उत्तम भोगण, गुन्नाप्पा भोगण, प्रभाकर हुंद्रे आदी शेतकऱ्यांच्या शेतात जंगली डुकरांनी हैदोस घालून रताळी पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे.
वन्यप्राण्यांच्या वाढत्या संख्येमुळे शेती करणे अवघड
कर्नाटक-महाराष्ट्र सीमा हद्दीवर असलेल्या डोंगर परिसरात अलीकडे वन्य प्राण्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले आहे. नैसर्गिक संकटांना तोंड देत, शेतकरी पिके घेत आहेत. मात्र वन्य प्राण्यांकडून फस्त केली जात आहेत. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.
वेल डुकरांकडून उखडून टाकण्याचा प्रकार
रब्बी हंगामात लावलेली रताळी मोठी होत असताना जंगली डुक्कर ती उखडून टाकत आहेत. खाण्यासाठी रताळी शिवारात हैदोस घालत आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून भरपाईची मागणी केली जात आहे.









