भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या साह्याने युरोपियन स्पेस एजन्सीच्या ‘प्रोबा 3’ या सौर मोहिमेचे झालेले यशस्वी प्रक्षेपण हा अवकाश क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा म्हणावा लागेल. याअंतर्गत अवकाशात सूर्यग्रहणाची स्थिती कृत्रिमरीत्या तयार करण्यात येणार असून, त्यातून सूर्याच्या वातावरणाचा अभ्यास करता येईल. हे या मोहिमेचे महत्त्व लक्षात यावे. या महत्त्वाकांक्षी मोहिमेला प्रोबा 3 असे नामाभिधान देण्यात आले आहे. ते समपर्कच म्हणता येईल. प्रोबा हा लॅटिन शब्द असून, त्याचा अर्थ चला प्रयत्न करू, असा आहे. इतर ग्रह, ताऱ्यांचा अभ्यास आणि सूर्याचा अभ्यास यामधला फरक सामान्य माणूसही सांगू शकतो. हे बघता सूर्याला कवेत घेण्याचे हे साहस क्रांतिकारकच. प्रोबा 3 अंतर्गत दोन उपग्रहांनी उ•ाण केले असून, हे दोन्ही उपग्रह सुस्थितीत असल्याचे शास्त्रज्ञांकडून सांगण्यात आले आहे. प्रोबा 3 मोहिमेतील एका उपग्रहावर 1.4 मीटर व्यासाची तबकडी बसविण्यात आली आहे. ही तबकडी खग्रास ग्रहणातील चंद्राप्रमाणे सूर्याचे काम करेल. सूर्याला ग्रहण लावणाऱ्या उपग्रहापासून 150 मीटर अंतरावर दुसरा निरीक्षक उपग्रह असेल. त्यावरील तीन वैज्ञानिक उपकरणांच्या साह्याने सूर्याभोवतीचे वातावरण, सूर्याकडून उत्सर्जित होणारी ऊर्जा तसेच पृथ्वीकडे येणाऱ्या विद्युतभारित कणांच्या नोंदी घेतल्या जाणार आहेत. यापूर्वी नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीच्या अर्थात ईसाच्या संयुक्त विद्यमाने सोहो ही मोहीम राबविण्यात आली होती. याद्वारे कृत्रिम सूर्यग्रहणाचा प्रयोगही करण्यात आला होता. आता प्रोबा 3 मधून अत्याधुनिक तंत्रज्ञानाची अशीच नवी चाचणी करण्यात येत आहे. यातून सूर्याच्या प्रभामंडळावर पडणारा प्रकाश संपूर्ण मानव जातीकरिता नक्कीच उपयुक्त ठरू शकतो. हे बघता या दोन निरीक्षण उपग्रहांचा पुढचा प्रवास कुतूहलजनक असेल. मुख्य म्हणजे विकसित देशांची अत्याधुनिक सौर वेधशाळा प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोची निवड होणे, हे मोठे यश ठरावे. यातून हलक्या ते मध्यम वजनाच्या मोहिमांच्या प्रक्षेपणासाठी भारतीय रॉकेट हा उत्तम पर्याय असल्याचा संदेश इतर देशांमध्ये जाऊ शकेल. त्याचबरोबर या मोहिमेतून जमा होणाऱ्या वैज्ञानिक नोंदी भारतीय शास्त्रज्ञांकरिताही दिशादर्शक ठरतील. इस्रोच्या स्थापनेपासून या संस्थेची वाटचाल थक्क करणारी राहिली आहे. यामध्ये इतर ग्रह, ताऱ्यांबरोबरच चंद्र आणि सूर्याचा वेध घेणाऱ्या मोहिम वैशिष्ट्यापूर्ण ठराव्यात. यातील आदित्य एल 1 ही भारताची पहिली सौर मोहीम होय. मागील वर्षी हे अंतराळयान प्रक्षेपित करण्यात आले. या वर्षीच्या सुऊवातीला ते एल 1 बिंदूच्या प्रभामंडल कक्षेत दाखल झाले. हा एल 1 बिंदू पृथ्वीपासून 15 लाख किमी दूर आहे. येथून सूर्यावर लक्ष ठेवता येते. आदित्यने आपल्यासोबत 7 वैज्ञानिक उपकरणे घेतली असून, ही सर्व स्वदेशी आहेत. या यंत्रांच्या साह्याने सूर्याच्या विविध भागांचा आपल्याला अभ्यास करणे शक्य झाले. सूर्याचे फोटोस्फियर, क्रोमोस्फियर आणि सूर्याभोवतीच्या वातावरणाचा अभ्यास करणे, हा या मोहिमेचा उद्देश होता. या दोन मोहिमांमधून सौरमंडलाचा व्यापक वेध घेणे निश्चितपणे शक्य होईल. मात्र, इस्रोच्या शास्त्रज्ञांची जिज्ञासा त्यांना शांत बसून देईल, असे नाही. पुढच्या काळात नवनवीन मोहिमांमधून सूर्याच्या आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न होईल, हे नक्की. भारताची चांद्रयान मोहीमही ऐतिहासिक मानली जाते. चांद्रयान 3 नंतर आता चांद्रयान 4 चे उद्दिष्ट बाळगण्यात आले आहे. याला मंजुरीही मिळाली असून, त्याकरिता 2 हजार कोटींहून अधिक खर्च अपेक्षित असेल. चांद्रयान 4 ही भारताची चौथी चांद्रमोहीम असून, ती चांद्रयान 3 च्या रोव्हरकडून मिळालेली माहिती पुढे नेईल. हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल आणि आजूबाजूच्या एक किमी परिघातील नमुने गोळा करून पृथ्वीवर आणेल. आधीच्या मोहिमेच्या तुलनेत हे मिशन अधिक प्रगत असेल. ही मोहीम 2027 पर्यंत प्रक्षेपित केली जाऊ शकते. तथापि, 2028 मध्येच ती पूर्ण करण्याचा दावा इस्रोने केला आहे. यातून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ज्या ठिकाणी खड्डे आहेत, तेथून नमुने घेण्याची इस्रोची योजना आहे. हे नमुने पृथ्वीवर आणण्यात येणार आहेत. हायड्रोजन, पाणी आणि बर्फासह इतर बाष्पशील पदार्थांच्या नोंदी येथे सापडल्याने हा भाग महत्त्वाचा असेल. अपोलो, लुना आणि चांग ई यांसारख्या मोहिमांनी चंद्रावरून नमुने आणले खरे. मात्र, ते ना दक्षिण ध्रुवावर उतरले, ना तेथून नमुने आणण्यात त्यांना यश आले. यातून भारताच्या मोहिमेचे वेगळेपण लक्षात यावे. यासोबतच इस्रोची शुक्रायन मोहीमही महत्त्वपूर्ण म्हणता येईल. शुक्र ग्रहाला इंग्रजित व्हीनस म्हणतात. म्हणूनच भारताच्या मोहिमेला व्हीनस ऑर्बिटर मिशन असे नाव देण्यात आले आहे. हे एक ऑर्बिटर मिशन असून, ते शुक्र ग्रहाची प्रदक्षिणा पूर्ण करत ग्रहाचे वातावरण, पृष्ठभाग आणि सूर्याच्या ग्रहावरील परिणामांचा अभ्यास करेल. शुक्राच्या वातावरणातील धुळीचे परीक्षण करून ग्रहाची छायाचित्रेदेखील गोळा करेल. या मिशनअंतर्गत शुक्राच्या चमकदार हवेचे विश्लेषण तसेच शुक्राचा पृष्ठभाग इतका गरम का आहे, याचाही शोध घेण्यात येईल. माणसाला अवकाश मंडलाबद्दल कायमच कुतूहल राहिले. सूर्य, चंद्रांसह ग्रह, तारे यांचे नेमके अस्तित्व काय, तेथील वातावरण काय असेल, याचा शोध म्हणूनच संपलेला नाही आणि कधी संपणारही नाही. पृथ्वीप्रमाणे अन्यत्र जीवसृष्टी आहे काय, याबाबत मानवामध्ये जिज्ञासा दिसते. आता सूर्य मंडल भेदण्याचे लक्ष्य आपण साधणार का, याची उत्सुकता असेल.
Previous Articleविजयेंद्र यांना पक्षश्रेष्ठींचे अभय
Next Article जगातील सर्वात सुंदर वाघिण
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








