सभागृहाबाहेरील व्हरांड्यात घडलेला प्रकार, योग्य देखभालीचा अभाव स्पष्ट
मडगाव : मडगाव पालिका इमारतीच्या सभागृहाबाहेरील व्हरांड्यातील छपराचे काँक्रिटचे तुकडे शुक्रवारी सकाळी खाली पडले. पालिकेचे योग्य प्रकारे देखभाल ठेवण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. पालिका मंडळाने इमारतीची डागडुजी करण्यासाठी ठराव मंजूर केल्यास कित्येक वर्षे उलटली आहेत. मात्र प्रत्यक्षात कोणतीही उपाययोजना राबविली जात असल्याचे दिसून येत नाही. काही दिवसांपूर्वी मडगाव आरोग्य केंद्राच्या वारसा इमारतीचा भिंत आणि काही भाग कोसळला होता. त्यावेळी फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी वारसा इमारती असलेल्या प्रशासकीय इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली होती. पालिका इमारत कोसळण्याची वाट पाहू नये, असे त्यांनी म्हटले होते. शुक्रवारी मडगाव पालिका इमारतीच्या छप्पराचे काँक्रिटचे काही भाग खाली कोसळल्यानंतर आमदार सरदेसाई यांनी यावर ट्विट करून पालिकेत सत्तेत असलेल्यांवर निशाणा साधण्याची संधी सोडली नाही.
दुर्लक्ष थांबले पाहिजे : सरदेसाई
‘हे दुर्लक्ष थांबलेच पाहिजे. आपल्या मडगाव या सुंदर आणि ऐतिहासिक शहराची संरचनात्मक पडझड हे सध्या होत असलेल्या नैतिक आणि राजकीय अध:पतनाचे तसेच ऱ्हासाचे प्रतिबिंब आहे, अशी प्रतिक्रिया फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी आपल्या ट्विटमध्ये व्यक्त केली आहे. कोणतीही योग्यता तसेच मडगाव किंवा गोव्याप्रती प्रामाणिकपणा, बांधिलकी वा प्रेम नाही आणि वैयक्तिक विकास तसेच संधिसाधूपणा यावर संपूर्ण लक्ष केंद्रीत झालेले आहे. शहराचे भविष्य घडविण्यासाठी ज्यांना निवडून दिलेले आहे त्यांच्याच नेतृत्वाखाली पूर्णपणे आणि अपरिहार्य नासाडी होत आहे’, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.
पाठपुरावा करणार : नगराध्यक्ष
दरम्यान, बहुतांश पालिका या वारसा इमारतीमध्ये स्थित असून त्यांची डागडुजी करण्यासाठी सरकार आवश्यक पावले उचलणार असल्याचे पालिका संचालक कार्यालयाकडून कळविण्यात आल्याने पालिकेने सध्या कोणतीही पावले उचललेली नसली, तरी यासंदर्भात आता निश्चितच पाठपुरावा करणार आहे, अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी व्यक्त केली.









