10 रुपयांचा मिळणार लाभांश : कंपनीची तिमाही कामगिरी मजबूत
वृत्तसंस्था/मुंबई
प्रसिद्ध फेव्हिकॉल उत्पादक पिडिलाईट इंडस्ट्रीज लिमिटेडने जून तिमाहीसाठी गुंतवणूकदारांना उत्कृष्ट निकालांसह एक मोठी बातमी दिली आहे. कंपनीने प्रति शेअर 10 रुपयांचा विशेष अंतरिम लाभांश आणि 1:1 बोनस शेअर जाहीर केला आहे. म्हणजेच ज्यांच्याकडे एक पूर्ण भरलेला शेअर आहे त्यांना एक अतिरिक्त बोनस शेअर मिळेल. कंपनीने माहिती दिली की लाभांश आणि बोनस शेअर्ससाठी रेकॉर्ड तारीख 13 ऑगस्ट 2025 निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच, या तारखेपर्यंत ज्या गुंतवणूकदारांकडे कंपनीचे शेअर्स आहेत ते या फायद्यासाठी पात्र असतील. 29 रोजी विशेष लाभांश दिला जाणार असल्याची माहिती आहे.
तिमाही निकाल मजबूत
जून 2025 तिमाहीत कंपनीची कामगिरी अत्यंत मजबूत राहिली. या कालावधीत, पिडिलाईटचा महसूल गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत 3,395 कोटी रुपयांवरून 10.5 टक्के वाढून 3,753 कोटी रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या निव्वळ नफ्यात देखील 18.6 टक्के वाढ झाली आहे आणि गेल्या वर्षीच्या याच कालावधीत तो 567 कोटी रुपयांवर पोहोचला होता. पिडिलाईटचे व्यवस्थापकीय संचालक सुधांशू वत्स म्हणाले की, देशातील मागणीत सुधारणा होत आहे, विशेषत: बांधकाम क्षेत्रात. चांगला मान्सून, कमी व्याजदर आणि तरलतेत सुधारणा या बाबी कंपनीसाठी सकारात्मक आहेत. मात्र भू-राजकीय परिस्थिती आणि जागतिक दरांबद्दल सतर्क राहणे महत्वाचे असणार आहे.









