मान्सूनपूर्व पावसाने झोडपले : पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबली: भाजीपाला पिकाचे नुकसान
वार्ताहर /किणये
तालुक्यात जोरदार मानसूनपूर्व पाऊस सुरू झाला आहे. गेल्या तीन दिवसापासून पावसाची रिमझिम सुरू असून, गुरुवारी या पावसाचा जोर वाढला होता. सध्या होत असलेल्या या पावसामुळे तालुक्यात मान्सूनचा पाऊस सुरू झाला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी आले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शिवारात अधिक प्रमाणात ओलावा निर्माण झाल्यामुळे पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबली आहेत.
गुरुवारी दिवसभर पावसाच्या सरी बरसत होत्या. सायंकाळी पुन्हा पावसाने वेग घेतला होता. या पावसामुळे भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हवामानातही कमालीचा बदल झाला आहे. हवामानात गारठा निर्माण झाल्यामुळे जणू मृग नक्षत्राला सुरुवात झाली असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. मच्छे व पिरणवाडी येथील काही गल्ल्यामध्ये पावसामुळे गटारीतून पाणी भरून वाहत होते. काही दुकानांमध्येही पाणी शिरले होते. गुरुवारी सायंकाळी दुकानातील पाणी काढताना दिसत होते. बिजगर्णी, बेळगुंदी, बामणवाडी रस्त्यांवरही पाणी आले होते. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला.
पावसामुळे धूळवाफ पेरणी खोळंबली
तालुक्यात 20 मे पासून धूळवाफ भातपेरणी करण्यात येते. यंदा मात्र अवकाळी व मान्सून पूर्व पावसामुळे धुळवाफ पेरणी पूर्णता कोळंबली आहे. शेतकरी शिवारात पेरणीपूर्व मशागतीची कामे करत होते. मात्र, पावसामुळे जमिनीत अधिक प्रमाणात ओलावा निर्माण झाल्याने पेरणीपूर्व कामेही ठप्प झाली आहेत. यामुळे भात पेरणीचा हंगाम साधायचा कसा याची चिंता बळीराजाला लागून राहिली आहे.
भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान : शेतकरी आर्थिक संकटात
सध्याच्या जोरदार पावसामुळे मिरची, कोथिंबीर, फ्लावर, गाजर, मका, बीन्स आदी भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर पिके कुजून जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. वळिवाच्या पावसामुळे काजू व आंबा पिकांचेही नुकसान झाले.









