अध्याय तिसरा
बाप्पा म्हणाले योगी निरनिराळ्या प्रकारे यज्ञ करून त्यांचे शरीर आणि मन योगाभ्यासाला अनुकूल करून घेतात. त्यामुळे त्यांच्या स्वभावात सत्वगुणाची वाढ होते आणि रज, तम गुण कमी होतात. ह्या सगळ्या यज्ञांचे फळ म्हणून योगी ब्रह्मप्राप्तीसाठी लायक होत जातो. मनुष्य जन्माला आल्यावर ब्रह्मप्राप्ती होण्यासाठी प्रयत्न करणे आणि ती प्राप्त करून घेणे हे मुख्य उद्दिष्ट असायला हवे. त्यासाठी माणसाने जन्माला आल्यावर निरपेक्षतेने कार्ये करावीत, शक्य असेल तेव्हढा दानधर्म करावा, लोकांच्या उपयोगी पडावे, प्राणायामाचा सराव करावा, साधना करून स्वभावात सत्वगुणाची वाढ करायचा प्रयत्न करावा असे जो करेल त्याचा जन्म सार्थकी लागेल. जे असे करणार नाहीत त्यांना पुन्हा मनुष्यजन्म मिळणार नाही मग त्यांना परलोकातील पुढील गती कशी मिळणार? म्हणून माणसाने सदैव सावध राहून आपली वर्तणूक वारंवार तपासत राहून त्यात आवश्यक ते बदल करण्याचा प्रयत्न करावा. मन आणि इंद्रिये इत्यादि गोष्टींचे योग्याने यज्ञात हवन करून टाकले असल्याने यज्ञाचा प्रसाद म्हणून त्याच्याकडे फक्त इश्वरी प्रेरणा शिल्लक असते व त्यानुसार त्याचे लोककल्याणकारी कार्य सुरू राहते.
पुढील श्लोकात बाप्पा कायिक, वाचिक व मानसिक यज्ञाबद्दल सांगत आहेत.
कायिकादित्रिधाभूतान्यज्ञान्वेदे प्रतिष्ठितान् ।
ज्ञात्वा तानखिलान्भूप मोक्ष्यसे?खिलबन्धनात् ।। 38 ।।
अर्थ- हे राजा, वेदांमध्ये सांगितलेल्या कायिक, वाचिक व मानसिक अशा तीन प्रकारच्या यज्ञांना पूर्ण जाणल्यावर तू सर्व बंधनापासून मुक्त होशील
विवरण- वेदांमध्ये कायिक, वाचिक आणि मानसिक असे तीन प्रकारचे यज्ञ सांगितले आहेत. यज्ञ म्हणजे पवित्र कर्म. एखादे पवित्र काम करताना त्यामागची पूर्वपीठिका समजून घेऊन केले तर ते अधिक चांगले होते कारण ते करत असताना योग्य वेळी योग्य गोष्टी केल्या जातात. म्हणून बाप्पा म्हणतायत हे यज्ञांचे तिन्ही प्रकार जो समजून घेईल तो त्याप्रमाणे कर्म करून बंधनातून मुक्त होईल. कायिक यज्ञ म्हणजे आपल्या शरीराला जे भोग प्राप्त झाले आहेत ते आपल्याच पूर्वीच्या कर्माचे फळ आहे हे समजून शांतपणे, वाईट न वाटून घेता ते भोगणे. वाचिक यज्ञ म्हणजे पूर्वी ज्याप्रकारे मी लोकांशी बोललो आहे त्याप्रकारची वाणी मला सध्या प्राप्त झाली आहे हे लक्षात घेऊन त्याबाबत दु:ख न करणे. मानसिक यज्ञ म्हणजे पूर्वी जी कृत्ये, मला वाटलं करावीत म्हणून मी केलेली आहेत त्यानुसार माझ्या आजच्या मनाची जडणघडण झालेली आहे हे लक्षात घेणं. म्हणून माझ्याच मनात असे विचार का येतात याबद्दल वाईट वाटून न घेणे.
कायिक, वाचिक, मानसिक यज्ञांचे वर्णन वाचल्यावर लगेच लक्षात येते की, जन्माला येऊन आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचे, बोलत असलेल्या प्रत्येक बाबीचे, इतकेच काय मनात करत असलेल्या प्रत्येक विचाराची ईश्वराकडे नोंद होत असते. त्यानुसार ह्या जन्मी आपल्या वाट्याला भोग येत असतात, पूर्वी आपण जसं इतरांशी प्रेमाने, रागाने बोललो असू तशा पद्धतीने बोलण्याची आपल्याला बुद्धी होत असते, पूर्वी आपण जसा विचार करत होतो त्याप्रमाणे ह्याजन्मी आपल्या मनात विचार येत असतात. म्हणून ह्या जन्मी वाट्याला आलेले भोग, बोलण्याची पद्धत, मनात येणारे विचार ह्या सर्वाचा स्वीकार करून त्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा ह्या जन्मी करण्याचा आपण प्रयत्न करायला हवा. हे सर्व लक्षात घेऊन पुढील जन्मी आपल्या वाट्याला कमीतकमी भोग येतील ह्यादृष्टीने वर्तणूक करावी, आवश्यक तेव्हढेच बोलण्याची दक्षता घ्यावी आणि मनात नेहमी लोकांचे भले होण्यासाठी काय करणे आवश्यक आहे त्याबद्दल विचार करावा.
क्रमश: