बेळगाव : उच्च शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर शरीराकडे लक्ष देणे ही काळाची गरज आहे. पूर्वी विविध खेळांकडे लक्ष दिले जात हेते. पण सध्या विद्यार्थी मोबाईलमध्ये गुंतले आहेत. त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी इतर खेळांकडे त्यांचे लक्ष केंद्रीत केले पाहिजे. शारीरिकदृष्ट्या विद्यार्थी कमजोर पडत आहेत. त्यासाठी नियमित व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे. आरसीयूतर्फे विद्यार्थ्यांची शारीरिकदृष्ट्या प्रगती व्हावी यासाठी दरवर्षी स्पर्धा भरविल्या जातात. त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त करून घ्यावा, असे प्रतिपादन राणी चन्नम्मा विद्यापीठाचे उपकुलगुरू प्रा. विजय नागण्णावर यांनी केले.
नेहरूनगर येथील जिल्हा क्रीडांगणावर आयोजित केलेल्या राणी चन्नाम्मा विद्यापीठ अंतर्गत क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रजिस्ट्रार केएसआय अधिकारी राजश्री जैनापूर, प्रा. शिवानंद गोरनाळ, वित्त अधिकारी आकाश एस. बी., आरसीयूचे क्रीडा निर्देशक जगदिश गस्ती, क्रीडा सचिव पी. नागराज आदी उपस्थित होते. पाहुण्यांच्याहस्ते क्रीडा ध्वजारोहण करण्यात आले. विद्यापीठाच्या 22 विभागाच्या संघाने पथसंचलन करून पाहुण्याला मानवंदना दिली. राज्यस्तरीय स्पर्धेत चमक दाखविलेल्या श्रीधर मैलार, कार्तिक, अशोक पुजारी, माळाप्पा यांनी क्रीडाज्योत मैदानावर फिरवून पाहुण्यांकडे सुपूर्द केली. श्रीधरने सर्व खेळाडूना शपथ दिली. यावेळी निवृत्त क्रीडा निर्देशक जी. एन. पाटील, एस. टी. पाटील, हर्षवर्धन शिंगाडे, शंकर कोलकार, डॉ. रामकृष्ण, उमेश मजुकर, सुनील बेळगुंदकर, संतोष चोपडे, आकाश लाड आदी उपस्थित होते. या क्रीडा स्पर्धेत 100, 200, 400 व 800 मीटर धावणे, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, उंच उडी, लांब उडी आदी अॅथलेटिक्स स्पर्धांना प्रारंभ करण्यात आले. व्हॉलीबॉल, थ्रोबॉल, कब•ाr, क्रिकेट, कॅरम, टेबल टेनिस, शटल बॅडमिंटन आदी सांघिक खेळांचा समावेश आहे.