कोल्हापूर / प्रतिनिधी
शासनाच्या विविध पेन्शन योजनांसाठी 65 वर्षांवरील वयाचा दाखला अत्यावश्यक असतो. पण बहुसंख्य वृद्ध नागरिकांचे शाळा सोडल्याचे दाखले उपलब्ध नसल्यामुळे ग्रामीण रुणांलयात शारीरिक तपासणी करूनच त्यांना वयाचे दाखले घ्यावे लागतात. त्यानुसार बुधवारी मल्हारपेठ (ता.पन्हाळा) येथील 15 महिलांची पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात तपासणी करून त्यांना वयाचे दाखले देण्यात आले. यावेळी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनंदा गायकवाड यांनी सर्व महिलांची शुगर,ब्लड प्रेशर,टी. बी.साठी स्क्रिनिंग , हिमोग्लोबिनची तपासणी करून त्यांना आवश्यक औषधे दिली.
मल्हारपेठ येथील वयोवृद्ध आणि निराधार नागरिकांना पेन्शन योजना मंजूर करण्यासाठी त्यांचे वयाचे दाखले काढणे अत्यावश्यक होते. त्यासाठी सरपंच सीताराम सातपुते आणि तरुण भारतचे विशेष प्रतिनिधी कृष्णात चौगले यांनी वयाचे दाखले काढण्यासाठी गावातच शिबिर घ्यावे यासाठी प्रयन सुरू केले. त्यानुसार तहसीलदार रमेश शेंडगे यांच्याकडून शिबिराबाबत पन्हाळा ग्रामीण रुगणालयाच्या नावे पत्र घेतले. सदरचे पत्र ग्रामीण रुग्णालयात दिल्यानंतर वयाच्या दाखल्याबाबत गावात येऊन शिबीर घेणे शक्य नसल्याचे डॉ.गायकवड यांनी सांगितले. त्यानंतर सिपीआर रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी स्वतः मल्हारपेठ येथे येऊन शिबीर घेतो असे अभिवचन दिले. पण कार्यालयीन कामकाजामुळे त्यांनाही शिबिरासाठी येणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांनी वयाचे दाखले काढण्यासाठी महिलांना पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात घेऊन जावे असे देशमुख यांनी सांगितले. त्यानुसार ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. गायकवाड यांनी महिलांना ग्रामीण रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध केली. त्यामुळे बुधवारी मल्हारपेठेतील 15 वयोवृद्ध महिलांची डॉ. सुनंदा गायकवाड यांनी तपासणी करून वयाचे दाखले दिले. तसेच रक्ताच्या अन्य तपासण्या करून आवश्यक औषधे दिली. गावातील अन्य वृद्ध नागरिकांची पुढील टप्प्यात तपासणी करून त्यांना वयाचे दाखले दिले जाणार आहेत. पन्हाळा रुग्णालयाच्या या आरोग्य सेवेबद्दल मल्हारपेठ ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी सरपंच सीताराम सातपुते, दिनकर कापसे, लखन कापसे आदी उपस्थित होते.