अध्याय अकरावा
हा गणेशगीतेतील शेवटचा अध्याय आहे. या अध्यायामध्ये बाप्पा राजाला तप, दान, ज्ञान, कर्म, सुखदु:ख, ब्रह्म, तसेच वर्णनिहाय कर्मांचे प्रकार इत्यादीबाबत माहिती देऊन स्वकर्म करत राहून ती मला अर्पण कर असा मोलाचा उपदेश करत आहेत. बाप्पांचा उपदेश ध्यानात घेऊन जो वागेल त्याला बाप्पांच्या कृपेने उत्तम योग साधता येईल म्हणजे त्याच्या आत्म्याचे परमात्म्याशी मिलन होईल अशी फलश्रुती शेवटी सांगितली आहे. तपाचे तीन प्रकार सांगून बाप्पा अध्यायाची सुरवात करत आहेत.
तपोऽ पि त्रिविधं राजन्कायिकादिप्रभेदतऽ ।
ऋजुतार्जवशौचानि ब्रह्मचर्यमहिंसनम् ।। 1।।
गुरुविज्ञद्विजातीनां पूजनं चासुरद्विषाम् ।
स्वधर्मपालनं नित्यं कायिकं तप ईदृशम् ।।2 ।।
अर्थ- श्रीगजानन म्हणाले, हे राजा, तप तीन प्रकारचे आहेत. ऋजुता सरळपणा कोणत्याही भानगडीत न पडतां सरळ मार्गाने जाणे, आर्जव सरळपणा कोणाचीही भीड न धरितां स्वत:ला योग्य वाटणाऱ्या मार्गाने जाणे, शौच, ब्रह्मचर्य, अहिंसा, गुरु, ज्ञानी, ब्राह्मण व देव यांचे पूजन करणे, नित्य स्वधर्मपालन करणे या प्रकारचे तप कायिक तप होय.
विवरण-यज्ञ, दान व तप ही भारतीय संस्कृतीची तीन अंगे होत. त्यातील तप मुख्य होय. आपलं आध्यात्मिक भलं व्हावं म्हणून एखादी गोष्ट चिकाटीने वारंवार करत राहणे ह्याला तप म्हणतात. देह, मनाला क्लेश देऊन किंवा तहान, भूक सहन करून, एकांतवासात राहून ईश्वराचे नामस्मरण करत तप करण्याला काहीजण महत्त्व देतात पण सर्वांच्यात राहून इतरांच्यासारखा जगाशी व्यवहार करून मनाला भौतिक गोष्टींच्या आकर्षणापासून दूर ठेवणे, मनातील विकारांवर काबू मिळवणे याला खरे तप म्हणता येईल. तपाचे कायिक, वाचिक व मानसिक असे तीन प्रकार आहेत. त्यापैकी कायिक तप म्हणजे काय हे आपण प्रथम समजावून घेऊ. माणसाला मायिक गोष्टींचे नेहमीच आकर्षण वाटत असते आणि त्या प्राप्त करून घेण्याच्या नादात स्वभावातील सत्वगुणाचे प्रमाण कमी होऊन, रज, तम गुणांचे प्राबल्य केव्हा निर्माण होते हे लक्षातही येत नाही. बघता बघता मनुष्य करू नये ते करून बसतो व नंतर पश्चाताप करत राहतो. अशी वेळ येऊ नये म्हणून कायिक तपाच्या माध्यमातून आपल्या दैनंदिन जीवनात खालील बंधने पाळल्यास आपल्याला आपल्या वर्तनाबद्दल पश्चाताप करायची वेळ येणार नाही. त्यासाठी आपण विचार कसा करावा, त्यानुसार कसे बोलावे आणि आचरण करावे ह्याबद्दल अधिक माहिती आपण घेऊ.
ऋजुता-ऋजुता अंगी बाणवण्यासाठी सरळ मार्गाने जाण्याचा सराव करणे आवश्यक असते. यामध्ये मन, वाणी आणि शरीर यांच्यात एकसुत्रीपणा आणण्याचा समावेश होतो. हा एकसूत्रीपणा कसा आणायचा ह्यावर विचार करू. आपल्या कृतीने दुसऱ्याला त्रास न होता, त्याचे भले व्हावे असे सरळपणे वागणाऱ्याला वाटत असते पण प्रत्यक्षात कळत, नकळतपणे विचार आणि कृती ह्यांचा मेळ बसत नाही आणि मग नंतर पश्चाताप करायची वेळ येते. कसे ते पाहू. माणसाच्या मनात अनेक विचार येत असतात पण ते सर्वच काही बोलून दाखवण्याजोगे नसतात. म्हणून तो त्याच्या मनातले विचार मनातच ठेऊन समोरच्याला आवडेल असं बोलतो पण प्रत्यक्षात कृती करताना मात्र त्याने विचार केल्यानुसार करतो. अर्थात आपल्या कृतीचे जे परिणाम होतात त्यामुळे दुसऱ्याला मानसिक किंवा शारीरिक त्रास होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन माणसाने नेहमी आपल्या कृतीने दुसऱ्याचे भले कसे होईल ह्याबद्दल विचार करण्याचा सराव करावा ह्याला कायिक तप असे म्हणतात. हे अंगवळणी पडले की, काय बोलावे व काय बोलू नये याची निवड करावी लागत नाही. तसेच वर्तणुकीतून दुसऱ्याचे भले व्हावे असे उद्दिष्ट असल्याने तसेच विचार मनात येतील, त्यानुसार बोलणे आणि त्याला धरून वागणे ह्या गोष्टी घडत जातील.
क्रमश:








