विक्रम लँडरची मोहिमेतील वाटचाल यशस्वी
वृत्तसंस्था/ बेंगळूर, नवी दिल्ली
चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरने अवकाशातून चंद्राच्या पृष्ठभागाचे फोटो काढले असून ते इस्रोला पाठवले आहेत. यामध्ये चंद्राचा पृष्ठभाग स्पष्टपणे दिसत आहे. विक्रम लँडरला प्रोपल्शन मॉड्यालपासून वेगळे केल्यानंतर चंद्राचा पहिला फोटो समोर आला आहे. हा फोटो लँडर ईमेजरने टिपला आहे. हा फोटो विक्रम लँडर इमेजरमध्ये बसवण्यात आलेल्या पॅमेरा-1 ने गुरुवार, 17 ऑगस्ट रोजी कैद केला आहे.
इस्रोचे चांद्रयान-3 आता चंद्राच्या आणखी जवळ पोहोचले आहे. शुक्रवारी चांद्रयान-3 चंद्रापासून 30 किलोमीटर अंतरावर पोहोचले आहे. यानंतर चांद्रयानने चंद्राच्या पृष्ठभागाचे फोटो पाठवले आहेत. भारताच्या महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची चंद्रमोहीम आता अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. चांद्रयान-3 चा विक्रम लँडर मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागापासून 30 किलोमीटर अंतरावर पोहोचला असून आता याचा वेग कमी-कमी केला जात आहे. आता विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न करेल.
चांद्रयानमधील लँडरचे नाव ‘विक्रम’ आणि रोव्हरचे नाव ‘प्रज्ञान’ असे असून दोघांचीही वाटचाल यशस्वीपणे सुरू आहे. विक्रम लँडरच्या यशस्वी लँडिंगनंतर म्हणजेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरल्यानंतर प्रज्ञान रोव्हर त्यातून बाहेर येईल आणि चंद्राच्या पृष्ठभागावर फिरेल. यापूर्वीच्या चांद्रयान-2 मोहिमेवेळी लँडरचा चंद्राच्या पृष्ठभागापासून 2 किमी आधी संपर्क तुटला होता. चांद्रयान-3 चंद्रावर यशस्वीपणे उतरल्यास भारत चंद्रावर उतरणारा चौथा देश ठरेल. त्यामुळे या मोहिमेकडे भारताप्रमाणे जगाचे लक्ष लागले आहे.









