कुपवाड :
ससा, कोल्हा आणि घोरपड या वन्यप्राण्यांच्या शिकारीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करणे, हे प्रकरण दुधेभावीच्या तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. ही बाब उघडकीस येताच दुधेभावीच्या तिघांना अटक करण्यात आली. या कारवाईत दोन दुचाकी व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सांगलीच्या वनविभागाने ही कारवाई केली.
या तरुणांनी दुधेभावीकरांचा बाब्या या सोशल मीडियावर दुधेभावी (ता. कवठेमहांकाळ) गावच्या परिसरात ससा, कोल्हा, घोरपड या वन्यप्राण्यांच्या शिकारीचे फोटो व व्हिडीओ अपलोड केले होते. याप्रकरणी संशयित भारत दगडू दुधाळ, गोविंद पंडीत चव्हाण, सुमित बापू हेगडे (सर्व रा. दुधेभावी ता. कवठेमहांकाळ) यांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातील गुन्ह्यातील दुचाकी, कुत्रीसह मुद्देमाल वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केल्याची माहिती सहाय्यक वनसंरक्षक अजित साजणे, वनपरिक्षेत्र अधिकारी सर्जेराव सोनवडेकर यांनी दिली.
याबाबत माहिती अशी, गावच्या परिसरात ससा, कोल्हा, घोरपड या वन्यप्राण्यांच्या शिकारीचे फोटो व व्हिडीओ दुधेभावी गावातील दुधेभावीकरांचा बाब्या या सोशल मीडियावर अपलोड केल्याचे प्रकरण उजेडात आले. याप्रकरणी वनविभाग अधिकाऱ्यांनी मंगळवारी १८ मार्च रोजी संशयित उमाजी जगन्नाथ मलमे (रा. दुधेभावी ता. कवठेमहांकाळ) या संशयितास अटक केली होती. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मलमे याची कसून चौकशी केली असता त्याच्या अन्य तीन साथीदारांची नावे तपासात समोर आली. याप्रकरणी वनविभागाचे एक पथक त्याचा शोध घेत होते. मंगळवारी सकाळी फरार तिघेही संशयित कवठेमहांकाळ येथे येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा लावल्याने कारवाईत तीन संशयितांना पकडण्यात आले. यावेळी त्यांनी भारत दुधाळ, गोविंद चव्हाण, सुमित हेगडे अशी त्यांनी नावे सांगितली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तिघांना अटक केली. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची वनकोठडी मिळाली. पथकाने संशयितांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (एम. एच. १०, सी. एस. ६४११), (एम. एच. १०, बी. डब्ल्यू, ५६३६) तसेच शिकारी कुत्री, नायलॉन वाघर, मोबाईल, मोबाईल, असा मुद्देमाल जप्त केला. सदर गुन्ह्यात एक विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करून त्याला नातेवाईकांच्या ताब्यात दिले. या कारवाईत उपवनसंरक्षक (प्रा.) निता कट्टे, विभागीय वन अधिकारी संजय वाघमोडे, सहाय्यक वनसंरक्षक डॉ. अजित साजणे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्जेराव सोनवडेकर, राजेंद्र नाईक, राजाराम तिवडे, तुषार भोरे, अजितकुमार सूर्यवंशी, परीक्षित जाधव, फायका पठाण, सागर थोरवत, राजकुमार मोसलगी, बाळासो पाटील, नागोजी रुपनर, विलास शिंदे, प्रमोद शिरतोडे यांनी तपास केला .








