वैभववाडी /प्रतिनिधी
वैभववाडी येथील संकल्प फोटो स्टुडिओचे मालक सचिन सावंत (40) रा.कुसूर पिंपळवाडी ता. वैभववाडी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. सचिन हे तालुक्यात छायाचित्रकार म्हणून प्रसिद्ध होते. रविवारी सकाळी दूध आणण्यासाठी घराबाहेर पडले होते. आईकडे दूध देऊन ते नेहमीप्रमाणे चालण्यासाठी गेले होते. मात्र बराच वेळ होऊनही ते घरी परत न आल्याने त्यांचा शेजारच्या नागरिकांनी शोध घेतला असता. त्यांची सायकल घरापासून काही अंतरावर रस्त्याकडेला आढळून आली. याच वेळी आजूबाजूला शोध घेतला असता ते जंगली झाडाला साडीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले. याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात आई ,पत्नी व तीन वर्षाची मुलगी असा परिवार आहे.









