फिनटेक कंपनीची तयारी : यूपीआय व्यवसायात अव्वल कंपनी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
फिनटेक क्षेत्रातील कंपनी फोन पे भारतीय शेअर बाजारामध्ये सूचीबद्ध होण्यासाठी तयारी करते आहे. भारतामध्ये दुसऱ्यांदा नोंदणीकृत झाल्यानंतर कंपनीच्या व्यवसायाला 10 वर्षे पूर्ण होत आहेत. हीच बाब लक्षात घेऊन फोन पेने येणाऱ्या कालावधीत आपला आयपीओ आणण्याचा विचार चालविला आहे.
तिसरी कंपनी
पेटीएम आणि मोबीक्विक या दोन कंपन्या मागच्या पाच वर्षांमध्ये शेअर बाजारामध्ये सूचीबद्ध झाल्या आहेत. यानंतर फिनटेक क्षेत्रातील फोन पे ही बाजारात सूचीबद्ध होणारी तिसरी कंपनी ठरणार आहे. डिसेंबर 2022 मध्ये कंपनीने आपली नोंदणी सिंगापूरमधून भारतात केली. त्यानंतर बिगर पेमेंट व्यवसायामध्ये कंपनी कार्यरत झाली.
आर्थिक कामगिरी
आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनीने 73 टक्के वाढीसह 5064 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला होता. याच कालावधीत कंपनीचा निव्वळ तोटा घसरून 1996 कोटी रुपये राहिला. जो आर्थिक वर्ष 2023 मध्ये 2795 कोटी रुपये होता.
यूपीआय व्यवसायामध्ये अव्वल
जानेवारी 2025 पर्यंत फोन पेचा युपीआय बाजारातील वाटा 47 टक्के इतका होता. यूपीआय पेमेंट बाजारामध्ये फोन पे ही अव्वल कंपनी मानली जाते. या कंपनीचे जवळपास 59 कोटी नोंदणीकृत ग्राहक आहेत. त्याचप्रमाणे 4 कोटीपेक्षा अधिक मर्चंट यांच्या पेमेंट प्रणालीशी जोडले गेले आहेत.









