केएलएस संघ उपविजेता, स्वयंम वड्डेबैलकर मालिकावीर, लाभ वेर्णेकर सामनावीर
बेळगाव : फिनिक्स पब्लिक स्कूल होनगा यांच्या वतीने रौप्य महोत्सवानिमित्त 25 व्या फिनिक्स चषक आंतरशालेय मुलांच्या 17 वर्षांखालील लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात सेंट झेवियर्स हायस्कूलने केएलएस स्कूल संघाचा 7 गड्यांनी पराभव करून फिनिक्स चषक पटकाविला. सामनावीर पुरस्कार लाभ वेर्णेकर तर मालिकावीर स्वयंम वड्डेबैलकर, (सेंट झेवियर्स) यांना गौरविण्यात आले. फिनिक्स मैदानावर अंतिम सामन्याला प्रारंभ होण्यापूर्वी प्रमुख पाहुणे निवृत्त सुभेदार सुभाष पाटील, रवींद्र हलकर्णी यांच्या हस्ते दोन्ही संघातील खेळाडूंचा परिचय करून देण्यात आला. सेंट झेवियर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना केएलएस हायस्कूल संघाने 20 षटकांत सर्व गडी गमावून 75 धावा काढल्या. केएलएस. स्कूलतर्फे सुरेंद्र पाटील 19, वेदांत दुधानी 15, तेजस 10 धावा काढल्या. सेंट झेवियर्स हायस्कूलतर्फे लाभ वेर्णेकर 20 धावात 3, स्वयंम वड्डेबैलकर 18 धावात 3, परीक्षेत वाडकर व लक्ष वेर्णेकर प्रत्येकी 2 गडी बाद केले.
उत्तरा दाखल खेळताना सेंट झेवियर्स हायस्कूल संघाने 17.2 षटकात 3 गडी गमावून 76 धावा करून सामना 7 गड्यांनी जिंकला. त्यात लाभ वर्णेकरने नाबाद 39 व स्वयंम वड्डेबैलकरने 20 धावा फटकाविल्या. केएलएस. स्कूलतर्फे सिद्धार्थ रायकरने 12 धावात 2 गडी बाद तर ऋषिकेशने 1 गडी बाद केला. बक्षीस वितरणप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून धारवाड विभागाचे माजी समन्वयक अविनाश पोतदार, फिनिक्स स्कूलचे संस्थापक चेअरमन विवेक पाटील, सेंट पॉल्श स्कूलचे मुख्याध्यापिक फादर साविवो अॅब्dरू, चेतन दिगल, सुशील जोशी, फिनिक्स स्कूलच्या प्राचार्या तैसिन मकानदार, उपप्राचार्य रामेश्वरी चावरीया यांच्या उपस्थितीत विजेत्या झेवियर्स व केएलएस संघांना चषक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. व अॅथलेटिक्स, हॉकी, विविध स्पर्धेची बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज पुरस्कार के. एल. एस. स्कूलचा अथर्व दिवटे तर उत्कृष्ट गोलंदाज हायस्कूलचा सुरेंद्र पाटील, स्पर्धेतील उदयोन्मुख क्रिकेटपटू हा पुरस्कार फिनिक्स स्कूलचा अजय कात्रज तर या स्पर्धेतील मालिकावीर पुरस्कार सेंट झेवियर्सच्या स्वयंम वड्डेबैलकर यांना देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्याला प्रमुख पंच म्हणून चंद्रशेखर पुरद व शेजाद पठाण व स्कोअरर म्हणून सागर तर समालोचन प्रमोद जपे यांनी काम पाहिले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महांतेश गवी व सुनील देसाई, अरुण कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.









